Header Ads

स्वप्नाला डेंग्यूचा घाला… अग्निवीर होण्यापूर्वीच अथर्वची जीवनयात्रा संपली!

 स्वप्नाला डेंग्यूचा घाला… अग्निवीर होण्यापूर्वीच अथर्वची जीवनयात्रा संपली! अवघ्या २० व्या वर्षी काळाचा घाला; राशिवडे बुद्रुक गाव शोकसागरात



राधानगरी :- देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून अथक परिश्रम करणाऱ्या एका तरुणाची जीवनयात्रा सुरू होण्यापूर्वीच संपली. राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथील कु. अथर्व संतोष निल्ले (वय २०) याचे डेंग्यूमुळे उपचारादरम्यान निधन झाले. काही दिवसांपूर्वीच अग्निवीर भरतीसाठी त्याची निवड झाली होती. मात्र, नियतीने त्याचे देशसेवेचे स्वप्न कायमचे हिरावून घेतल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अथर्व हा अभ्यासू, मेहनती आणि खेळाडू वृत्तीचा युवक होता. भारतीय सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याचे त्याचे बालपणापासूनचे स्वप्न होते. त्यासाठी तो नियमित शारीरिक सराव, धावणे आणि विविध चाचण्यांची तयारी करत होता. त्याच्या मेहनतीला यश मिळाले आणि नुकतेच अग्निवीर भरती प्रक्रियेत त्याची निवड झाली. ही आनंदाची बातमी मिळताच निल्ले कुटुंबीयांसह गावातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, काही दिवसांपूर्वी अथर्वला ताप आला. तपासणीत त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. प्रकृती बिघडल्याने त्याला प्रथम भोगावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाही गुरुवारी दुपारी अथर्वची प्राणज्योत मालवली.

एकुलत्या एक मुलाच्या निधनाने निल्ले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वी ज्या घरात अग्निवीरच्या निवडीचा आनंद साजरा होत होता, त्याच घरात आज शोककळा पसरली आहे. अथर्वच्या अकाली निधनामुळे मित्रपरिवार, नातेवाईक आणि राशिवडे बुद्रुक गावातील नागरिकांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

अथर्वच्या पश्चात आई, वडील, बहीण तसेच चुलते-चुलती असा परिवार आहे. देशसेवेचे स्वप्न डोळ्यांत साठवून जगणाऱ्या या होतकरू तरुणाच्या अकाली जाण्याने संपूर्ण राधानगरी तालुका हळहळला असून, "अग्निवीर होण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं" अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

No comments:

Powered by Blogger.