मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कोल्हापुरात वाहतुकीचे मोठे बदल; ‘नो पार्किंग झोन’ जाहीर
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कोल्हापुरात वाहतुकीचे मोठे बदल; ‘नो पार्किंग झोन’ जाहीर ९ ऑगस्टला मार्ग बंद, अवजड वाहनांना प्रवेशबंदी; नागरिकांना प्रशासनाचे सहकार्याचे आवाहन.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~कोल्हापूर : - राज्याचे मुख्यमंत्री तसेच अन्य मंत्रीमहोदयांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि व्हीव्हीआयपी सुरक्षेच्या दृष्टीने कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून रविवारी, ९ ऑगस्ट २०२६ रोजी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मुख्यमंत्री व व्हीव्हीआयपींचा वाहन ताफा मार्गस्थ होत असताना तावडे हॉटेल ते ताराराणी सिग्नल, धैर्यप्रसाद चौक, आदित्य कॉर्नर, खानविलकर पेट्रोल पंप, सीपीआर, दसरा चौक, रंकाळा वेशमार्गे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच गरजेनुसार अन्य मार्गांवरील वाहतूकही कॉन्व्हॉय मार्गस्थ होईपर्यंत थांबविण्यात येईल.
अवजड वाहनांना प्रवेशबंदी
शियेहून कसबा बावड्याकडे येणाऱ्या अवजड वाहनांना शिये येथेच प्रवेशबंदी करण्यात आली आहे. रत्नागिरीकडून कोल्हापूरकडे येणाऱ्या अवजड वाहनांना वडणगे फाटा येथे प्रवेश बंद असून, या वाहनांनी राष्ट्रीय महामार्गाचा वापर करावा.
गगनबावड्याकडून येणाऱ्या जड वाहनांना फुलेवाडी नाका येथे प्रवेशबंदी असेल. या वाहनांना नवीन वाशी नाका, कळंबा साई मंदिर, संभाजीनगर आणि हॉकी स्टेडियम मार्गे पुढे जाता येईल.
तीन मार्गांवरील वन-वे नियम तात्पुरता शिथिल
व्हीव्हीआयपी वाहन ताफ्याच्या सोयीसाठी दुर्गा चौक ते खाचके पुतळा, मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर आणि बिनखांबी गणेश मंदिर ते खरी कॉर्नर या मार्गांवरील वन-वे नियम तात्पुरता शिथिल करण्यात आला आहे. या मार्गांवर ये-जा करण्यास परवानगी असेल.
‘नो पार्किंग झोन’मध्ये वाहन लावल्यास कारवाई
दुर्गा चौक ते खाचके पुतळा चौक ते केशवराव भोसले नाट्यगृह, खाचके पुतळा ते पाटाकडील तालीम चौक तसेच दिलबहार ते खाचके पुतळा ते खरी रोड या मार्गांवर सर्वसामान्य वाहनांना पार्किंग करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीतील व शासकीय वाहनांना यामधून वगळण्यात आले आहे.
वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था
नागरिक व व्हीआयपी वाहनांसाठी प्रशासनाने पुढील पार्किंग ठिकाणे निश्चित केली आहेत—
खरे रोड – व्हीव्हीआयपी वाहने
छत्रपती शिवाजी स्टेडियम – व्हीआयपी व सर्वसाधारण वाहने
साई पार्किंग (खासगी) – सर्वसाधारण वाहने
बिंदू चौक महानगरपालिका पार्किंग – सर्वसाधारण वाहने
मुख्यमंत्री दौऱ्याच्या कालावधीत हे वाहतूक बदल लागू राहणार असून, नागरिकांनी रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने पार्क करू नयेत. वाहतूक पोलिसांना सहकार्य करून निर्धारित पार्किंग ठिकाणांचाच वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

No comments: