कुपवाडमध्ये ‘शोले’ स्टाईल प्रेमप्रकरणाचा थरार; प्रेयसीच्या होकारासाठी प्रियकर थेट मोबाईल टॉवरवर!
कुपवाडमध्ये ‘शोले’ स्टाईल प्रेमप्रकरणाचा थरार; प्रेयसीच्या होकारासाठी प्रियकर थेट मोबाईल टॉवरवर!
पोलिसांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश; तरुणाला सुखरूप खाली उतरवले, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी.
कुपवाड | प्रतिनिधीकुपवाड येथील स्वामी मळा परिसरात शनिवारी (दि. ८ ऑगस्ट) एका प्रेमप्रकरणातून चांगलाच थरार निर्माण झाला. प्रेयसीने होकार द्यावा, या मागणीसाठी सांगलीतील एका तरुणाने थेट मोबाईल टॉवरवर चढून बसल्याची घटना घडली. ‘प्रेयसी घटनास्थळी आल्याशिवाय खाली उतरणार नाही’, अशी भूमिका घेतल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय जाधव नामक तरुण मोबाईल टॉवरवर चढला होता. तो बराच वेळ टॉवरवरच असल्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले. काही वेळातच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली.
या घटनेची माहिती मिळताच कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. टॉवरवर चढलेल्या तरुणाशी पोलिसांनी संवाद साधण्यास सुरुवात केली. त्याला शांत करत सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी पोलिसांकडून अथक प्रयत्न करण्यात आले.
तरुणाला कोणतीही इजा होऊ नये, यासाठी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने विशेष खबरदारी घेतली. समजूत घालत तसेच सातत्याने संवाद साधत अखेर पोलिसांना तरुणाला टॉवरवरून खाली उतरवण्यात यश आले. तरुण सुखरूप खाली आल्यानंतर पोलिसांसह उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
या संपूर्ण प्रकारामुळे काही काळ स्वामी मळा परिसरात मोठी गर्दी झाली होती. मोबाईल टॉवरवर तरुण चढल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेक जण या घटनेची चर्चा करताना दिसून आले.
दरम्यान, ‘शोले’ चित्रपटातील धर्मेंद्रने पाण्याच्या टाकीवर चढून प्रेम व्यक्त केल्याच्या प्रसिद्ध प्रसंगाची आठवण या घटनेमुळे उपस्थितांना झाली. त्यामुळे या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा रंगली.
मात्र, प्रेम व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारे धोकादायक पाऊल उचलणे जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे कोणत्याही भावनिक प्रसंगात स्वतःच्या जीविताला धोका निर्माण होईल, असे कृत्य करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.
पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे अखेर तरुण सुखरूप खाली उतरला आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

No comments: