मोगर्डेत ३८ लाखांचे समाज मंदिर बांधकामाआधीच कोसळले!
मोगर्डेत ३८ लाखांचे समाज मंदिर बांधकामाआधीच कोसळले!
ठेकेदाराच्या निष्कृष्ट कामाचा ग्रामस्थांचा आरोप; चौकशी करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी.
राधानगरी:-राधानगरी तालुक्यातील मोगर्डे येथे शासनाच्या ३८ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात येत असलेले समाज मंदिर पूर्ण होण्याआधीच कोसळल्याने खळबळ उडाली आहे. बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून, संबंधित ठेकेदाराच्या कामाची तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मार्च २०२३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेंतर्गत मोगर्डे येथील समाज मंदिरासाठी शासनाकडून तब्बल ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर बांधकामाला सुरुवात झाली; मात्र ठेकेदाराच्या संथ आणि निष्काळजी कारभारामुळे तब्बल तीन वर्षे उलटूनही काम पूर्ण झाले नाही.
अखेर जुलै २०२६ मध्ये निर्माणाधीन इमारतीचा भाग अचानक खचून कोसळला. समाज मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच कोसळल्याने शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बांधकामात अत्यंत हलक्या दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संबंधित बांधकामाची तांत्रिक तपासणी करून दोषी कोण, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ठेकेदाराची सखोल चौकशी करून दोष आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी, संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि मोगर्डे गावासाठी नवीन समाज मंदिर उभारण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
३८ लाखांचा निधी, तीन वर्षे विलंब आणि अखेर बांधकाम कोसळले!
शासनाच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या सार्वजनिक वास्तूंच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने संबंधित विभाग याप्रकरणी काय कारवाई करणार? याकडे मोगर्डे ग्रामस्थांसह संपूर्ण राधानगरी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

No comments: