Header Ads

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी आरोग्याचा ‘किट’!

 दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी आरोग्याचा ‘किट’!

कडवी-कासारी खोऱ्यातील तब्बल ३ हजार विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने आरोग्य किटचे वाटप; स्वच्छता, आरोग्य अन् शिस्तीच्या सवयी रुजविण्याचा संकल्प

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शाहूवाडी | प्रतिनिधी.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, आरोग्य व शिस्तीच्या सवयी लहानपणापासूनच रुजाव्यात, या उद्देशाने कडवी व कासारी खोऱ्यात आरोग्य किट वाटपाचा विधायक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमातून सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने आरोग्य किटचा लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या सौ. स्नेहल वेल्हाळ यांनी दिली.

वालूर येथील विद्या मंदिर प्राथमिक शाळेत आयोजित आरोग्य किट वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच वंदना पाटील होत्या.

यावेळी विद्यार्थिनींनी औक्षण करून मान्यवरांचे स्वागत केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी सौ. स्नेहल वेल्हाळ व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार केला.

“लहानपणी लागलेल्या आरोग्यदायी सवयी आयुष्यभराची शिदोरी ठरतात,” असे सांगत सौ. वेल्हाळ यांनी ग्रामीण व दुर्गम भागातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आरोग्यविषयक सुविधा आणि जनजागृती पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.

शाळेच्या विकासासाठीही मागण्या

मुख्याध्यापक राजेंद्र लाडे यांनी प्रास्ताविकात शाळेसाठी स्वच्छतागृह उभारणीसाठी निधी तसेच संगणक प्रयोगशाळेसाठी संगणक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने स्वच्छतागृह व संरक्षण भिंतीसाठी निधी मंजूर करण्याबाबतचे निवेदन सौ. वेल्हाळ यांना देण्यात आले.

यावेळी त्यांच्या हस्ते शाळेतील विविध उपक्रमांवरील हस्तलिखितांचे अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा लता पाटील, सदस्य मानसी पाटील, सुरेखा नाकाडे, गायत्री पाटील, संतोष आळेसे, विजय पाटील, अंगणवाडी सेविका सुरेखा माने, मंजुश्री सबनीस, आरोग्य सेविका प्रमिला चव्हाण, आशा सेविका सविता पाटील, विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संदीप बडे यांनी मानले.

“विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून स्वच्छता, आरोग्य आणि शिस्तीच्या सवयी रुजल्या तर ते भविष्यात निरोगी, सुदृढ व सक्षम नागरिक बनतील. ग्रामीण व दुर्गम वस्तीवरील प्रत्येक मुलापर्यंत आरोग्याची सुविधा पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे.”

— सौ. स्नेहल वेल्हाळ, जिल्हा परिषद सदस्या, शाहूवाडी

No comments:

Powered by Blogger.