बोंद्रेनगरच्या मातीत घुमला आदिवासी एकतेचा तारपा!
बोंद्रेनगरच्या मातीत घुमला आदिवासी एकतेचा तारपा!
जिल्हा परिषद सोसायटी हॉलमध्ये उत्साहात साजरा झाला जागतिक आदिवासी दिन; विद्यार्थी, समाजसेवकांचा गौरव.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~कोल्हापूर, दि. ९ ऑगस्ट
‘जल, जंगल, जमीन आणि स्वाभिमान’ या विचारांनी प्रेरित होत जागतिक आदिवासी दिनाचा सोहळा बोंद्रेनगर येथील जिल्हा परिषद सोसायटी हॉलमध्ये उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या मातीत स्थायिक झालेल्या राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील आदिवासी बांधव-भगिनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच छताखाली एकवटले. ‘जय जोहार! जय बिरसा!’च्या घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी समाजासाठी संघर्ष करणाऱ्या क्रांतिकारकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या त्याग, शौर्य आणि सामाजिक संघर्षाचे स्मरण करून उपस्थितांनी आदरांजली वाहिली. त्यांच्या कार्यातून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेंद्र भारूड उपस्थित राहणार होते. मात्र मुख्यमंत्री यांच्या नियोजित दौऱ्यामुळे त्यांना कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही. त्यांनी आयोजक आणि आदिवासी समाजबांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
शिक्षणातूनच समाजाची प्रगती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. दुर्गेश वळवी होते. अध्यक्षीय भाषणातून त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्या. शिक्षणाच्या जोरावरच व्यक्ती, समाज आणि देशाची प्रगती शक्य आहे. विकासाच्या प्रवाहात आदिवासी समाजानेही खांद्याला खांदा लावून पुढे यावे,’ असे आवाहन त्यांनी पालकांना केले.
स्वागताध्यक्ष आणि राष्ट्रपती शौर्य पदक विजेते मा. भगवंत शिंगाडे यांनी उपस्थितांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. तर ऑल इंडिया आदिवासी फेडरेशनच्या उपाध्यक्षा मा. मंगल भिसे यांनी आदिवासी महिलांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अधिक सक्रिय सहभाग घ्यावा, असे सांगितले. समाजाच्या जडणघडणीत महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ आदिवासी सेवकांचा गौरव
या सोहळ्यात समाजासाठी दीर्घकाळ निस्वार्थ सेवा बजावणारे ज्येष्ठ आदिवासी सेवक मा. खेवजी दाते यांना ‘आदिवासी सेवक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. समाजसेवेतील त्यांच्या योगदानाचा गौरव होत असताना उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
यावेळी शंकर पोटे आणि नारायण भोमाळे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच सुषमा तारडे यांचा पदोन्नतीबद्दल सत्कार करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला. इयत्ता चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसह दहावी आणि बारावीमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

No comments: