शासकीय जागेवर अतिक्रमण करून व्यायामशाळा उभारली? चौकशी न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा.
शासकीय जागेवर अतिक्रमण करून व्यायामशाळा उभारली? चौकशी न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा.
राधानगरी :- राधानगरी तालुक्यातील फेजीवडे (रामाचीवाडी) येथे शासकीय जागेवर अतिक्रमण करून सरपंच व काही सदस्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून व्यायामशाळेची इमारत उभारल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिकेत कांबळे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन राधानगरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सन २०२३–२४ च्या जिल्हा वार्षिक योजनेतील निधीचा गैरवापर करून शासकीय जागेवर अतिक्रमण करण्यात आले. तसेच सरपंच व सदस्यांनी पदाचा गैरवापर करून व्यायामशाळेचे बांधकाम केले असून या कामात शासनाची दिशाभूल झाली आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, सदर इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
जर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली नाही, तर जनतेला सोबत घेऊन उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिकेत कांबळे यांनी दिला.

No comments: