गांधीनगर बाजारपेठेत बनावट कपड्यांचा साठा; दोघा व्यापाऱ्यांवर गुन्हा
गांधीनगर बाजारपेठेत बनावट कपड्यांचा साठा; दोघा व्यापाऱ्यांवर गुन्हा
नामांकित कंपन्यांचे बनावट लेबल लावलेले जीन्स-पॅन्ट, टी-शर्ट जप्त; ७ लाख ४५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
गांधीनगर : नामांकित कंपन्यांच्या नावाचा गैरवापर करून बनावट लेबल लावलेल्या जीन्स पॅन्ट व टी-शर्टची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा केल्याप्रकरणी गांधीनगर बाजारपेठेतील दोघा व्यापाऱ्यांवर गांधीनगर पोलिस ठाण्यात कॉपीराइट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही दुकानांमधून तब्बल ७ लाख ४५ हजार ३०० रुपये किमतीचा बनावट कपड्यांचा साठा हस्तगत केला आहे.
याप्रकरणी कंपनीचे वरिष्ठ क्षेत्रीय अधिकारी दीपक बाबूलाल पटेल (वय ४८, रा. पल्स सोसायटी, जयनगर, मालाड, मुंबई) यांनी गांधीनगर पोलिसांत फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश अनिलकुमार केसवानी (वय ३०, रा. नटराज हॉटेलजवळ, ताराबाई पार्क, कोल्हापूर) याच्या ट्रेड क्रॉसिंग होलसेल या दुकानाची तपासणी करण्यात आली. यावेळी केल्विन क्लेन या नामांकित कंपनीचे बनावट लेबल लावलेले टी-शर्ट विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे आढळून आले.
त्याचप्रमाणे नितीन हरेशलाल वासवानी (रा. कुलवंत पार्क, गांधीनगर) याच्या एन.एन. एजन्सी होलसेल या दुकानातही तपासणी करण्यात आली. तेथे लेव्हिस आणि टॉमी हिलफिगर या कंपन्यांच्या नावाचे बनावट लेबल लावलेल्या जीन्स पॅन्टचा साठा आढळून आला.
दोन्ही दुकानांमधून मिळून ७ लाख ४५ हजार ३०० रुपये किमतीचा बनावट कपड्यांचा माल हस्तगत करण्यात आला. नामांकित कंपन्यांच्या ट्रेडमार्क व लेबलचा परवानगीशिवाय वापर करून ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने हा माल विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
कंपनीचे वरिष्ठ क्षेत्रीय अधिकारी दीपक पटेल यांच्या फिर्यादीवरून निलेश केसवानी आणि नितीन वासवानी या दोघांविरुद्ध कॉपीराइट अॅक्टअंतर्गत गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या बनावट मालाची पुढील तपासणी व या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
बनावट मालाच्या विक्रीवर पोलिसांची नजर
गांधीनगर बाजारपेठेत नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट कपडे विक्री होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. बनावट लेबल लावून माल विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

No comments: