हरिपूरमध्ये अवैध धंद्यांना ऊत? प्रशासनाला जय भीम क्रांती सेनेचे निवेदन; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
हरिपूरमध्ये अवैध धंद्यांना ऊत? प्रशासनाला जय भीम क्रांती सेनेचे निवेदन; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.
मिरज | प्रतिनिधी
मिरज तालुक्यातील हरिपूर गावासह परिसरात अवैध गावठी दारू, मोठ्या प्रमाणावर मटका, अवैध सावकारी, घरगुती गॅस सिलेंडरचा कथित काळाबाजार तसेच नशायुक्त पदार्थांची विक्री सुरू असल्याचा आरोप करत जय भीम क्रांती सेनेच्या वतीने जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
या अवैध व्यवसायांमुळे सर्वसामान्य नागरिकांसह तरुण पिढीवर विपरीत परिणाम होत असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जय भीम क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी जिल्हाधिकारी कणीचे मॅडम, जिल्हा पुरवठा अधिकारी फुलके सर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक देशमुख सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कोकाटे सर यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी मा. संस्थापक अध्यक्ष गॅब्रियल भाऊ तिवडे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाकडून तातडीने कारवाई झाली नाही, तर जय भीम क्रांती सेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी मिरज तालुका कार्याध्यक्ष विनोद दादा तांदळे, राज्य समन्वयक राम मोरे, पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष प्रशांत भाऊ आवळे, जिल्हाध्यक्ष विक्रम भैया मोहिते यांच्यासह संघटनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी
हरिपूर व मिरज तालुक्यातील संबंधित भागात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध व्यवसायांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संयुक्त पथकाद्वारे तपासणी, छापेमारी व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. आता प्रशासन या तक्रारीची कितपत दखल घेते आणि प्रत्यक्षात कोणती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments: