Header Ads

करवीर तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचे ‘बोंब मारो’ आंदोलन

 करवीर तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचे ‘बोंब मारो’ आंदोलन

आयटी रिटर्न्सच्या निकषावर बंद केलेले रेशनचे धान्य तत्काळ सुरू करण्याची मागणी.

गांधीनगर : आयटी रिटर्न्सच्या नावाखाली बंद करण्यात आलेले रेशनवरील धान्य तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करवीर तहसील कार्यालयासमोर ‘बोंब मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी शासनाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला.

आयटी रिटर्न्स भरल्याच्या निकषावर रेशनचे धान्य बंद केल्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. घर, मोटारसायकल किंवा इतर गरजांसाठी बँकेकडून कर्ज घेताना अनेक सामान्य नागरिक आयटी रिटर्न्स भरतात. त्यामुळे केवळ आयटी रिटर्न्स भरला म्हणून संबंधित व्यक्तीची आर्थिक स्थिती सक्षम आहे, असे गृहीत धरणे चुकीचे आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

टपरीचालक, केळी-भाजी विक्रेते, भूमिहीन तसेच अल्पभूधारक नागरिकांनाही या निकषाचा फटका बसत असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शासनाने गोरगरीबांच्या तोंडचा घास काढून घेणारे हे निकष तातडीने रद्द करून रेशनवरील धान्य पुन्हा सुरू करावे, अशी मागणी उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्यासह शिवसैनिकांनी केली.

चुकीच्या निकषांमुळे बंद झालेले रेशनचे धान्य तातडीने सुरू करावे, या मागणीचे निवेदन निवासी नायब तहसीलदार भालचंद्र यादव आणि पुरवठा निरीक्षक विलास देसाई यांना देण्यात आले. मागणी शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.

आंदोलनात शहरप्रमुख विशाल देवकुळे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख हर्षल पाटील, राहुल गिरुले, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, वीरेंद्र भोपळे, सचिन नागटिळक, शिवाजी लोहार, दीपक फ्रेमवाला, सुनील पारपाणी यांच्यासह संतोष चौगुले, दत्तात्रय विभुते, कैलास जाधव, वसंत पवार, मनोज कुरळे, दिलीप चव्हाण, अभिजीत गुरव, अजित चव्हाण, आबा जाधव, रामराव पाटील, धनंजय पाटील, बाबुराव पाटील, प्रफुल्ल घोरपडे, अकबर फकीर, कृष्णात तुरुके, अशोक कोळी, साहिल देवळे, मोहन रजपूत आदी शिवसैनिक, पदाधिकारी व रेशनधारक उपस्थित होते.

फोटो ओळ : रेशनवरील धान्य तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करवीर तहसील कार्यालयासमोर ‘बोंब मारो’ आंदोलन करताना शिवसैनिक.

No comments:

Powered by Blogger.