बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात मुख्य आरोपी जेरबंद; करवीर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
शशिकांत कुंभार.
~~~~~~~~~~~~~
कोल्हापूर :-
बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्निल केरबा पाटील याला त्याच्या दोन एजंटांसह अटक करण्यात करवीर पोलिसांना मोठे यश आले आहे. फरार असलेल्या आरोपीला पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह रंगेहात ताब्यात घेत पोलिसांनी सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ४०७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम, गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (PCPNDT) कायदा आणि वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी स्वप्निल पाटील हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कागल–मुरगूड मार्गावरील पिंपळगाव खुर्द येथे सापळा रचण्यात आला. यावेळी स्वप्निल पाटील हा त्याचे एजंट संतोष ज्ञानदेव कोळी (रा. मडिलगे, ता. भुदरगड) आणि नंदकुमार भीमराव पाटील (रा. आरवडे, ता. तासगाव, जि. सांगली) यांच्यासह पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन आला असता पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान आरोपींकडून सोनोस्कोप कंपनीचे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, चारचाकी वाहन, मोबाईल फोन असा सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड यास न्यायालयाने ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, अटक केलेल्या आरोपींनाही न्यायालयात हजर करून पुढील पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने केली. या कारवाईत सहायक फौजदार राहुल देसाई तसेच रणजित पाटील, विजय तळसकर, महेश बांबळे, आत्माराम शिंदे, अमोल चव्हाण, सोमराज पाटील, अविनाश कांबळे, श्रीधर जाधव, प्रकाश कांबळे आणि प्रविण बोरचाटे यांनी सहभाग घेतला.
करवीर पोलिसांनी अल्पावधीत फरार मुख्य आरोपीला अटक करून बेकायदेशीर गर्भलिंग निदानाविरोधात कठोर कारवाईचा संदेश दिल्याने या कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

No comments: