राधानगरी धरण परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त! रात्री स्वतः पोलीस निरीक्षकांची पेट्रोलिंग; ड्रोन, फोटो-व्हिडिओवर निर्बंध
राधानगरी धरण परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त! रात्री स्वतः पोलीस निरीक्षकांची पेट्रोलिंग; ड्रोन, फोटो-व्हिडिओवर निर्बंध.
राधानगरी :- राधानगरी धरण परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी कडक पावले उचलली असून मंगळवारी रात्री सुमारे 8.30 वाजता पोलीस निरीक्षक अजित सिंद यांनी स्वतः धरण परिसरात पेट्रोलिंग करून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी धरण परिसरातील सुरक्षा, पर्यटकांची वर्दळ तसेच संवेदनशील ठिकाणांची सखोल तपासणी करण्यात आली.
पाहणीनंतर पोलीस निरीक्षक अजित सिंद यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देत सांगितले की, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, पत्रकार आणि इतर अधिकृत व्यक्ती वगळता कोणालाही धरण परिसरात प्रवेश देऊ नये.
राधानगरी धरण हे अतिसंवेदनशील (मर्मस्थळ) असल्याने ड्रोनद्वारे चित्रीकरणास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. तसेच पुरस्थितीची माहिती वगळता धरणाच्या मुख्य बांधकामाची छायाचित्रे, व्हिडिओ किंवा इतर संवेदनशील माहिती सोशल मीडियावर अथवा इतर माध्यमांतून प्रसारित करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या.
याशिवाय स्वयंचलित दरवाजांजवळ पर्यटकांच्या हालचालींवर विशेष नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनावश्यक गर्दी किंवा धोकादायक कृत्यांमुळे जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ राधानगरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देत पोलीस प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

No comments: