विद्यार्थ्यांच्या वाढदिवशी एक झाड : खामुंडी जिल्हा परिषद शाळेचा पर्यावरणपूरक संकल्प.
विद्यार्थ्यांच्या वाढदिवशी एक झाड : खामुंडी जिल्हा परिषद शाळेचा पर्यावरणपूरक संकल्प.
~~~~~~~~~~~~खामुंडी (ता. जुन्नर ) : वाढदिवस म्हणजे केक कापणे आणि पार्टी करणे एवढ्यापुरताच मर्यादित न ठेवता, तो पर्यावरणासाठी समर्पित करायचा — असा अभिनव निर्णय जिल्हा परिषद शाळा खामुंडीने घेतला आहे. या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी आता आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शाळेच्या परिसरात किंवा गावात एक झाड लावणार आहे.
शालेय समिती, शिक्षक व पालक यांच्या एकमताने हा संकल्प मंजूर करण्यात आला आहे . शाळेच्या मुख्याध्यापक सविता हिरे तसेच सुखदेव पथवे, दीपाली डुंबरे,शोभा खर्गे, काशिनाथ इले या शिक्षकांच्या पुढाकाराने "जन्मदिन आणि वृक्षारोपण" ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे.
शाळेच्या मुख्याध्यापीका सविता हिरे यांनी सांगितले, "आजची पिढी पर्यावरणापासून दुरावत चालली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना निसर्गाशी जोडणे आणि जबाबदारीची जाणीव देणे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. एका वर्षात २०-३० नवीन झाडे शाळेला आणि गावाला मिळतील."
विद्यार्थ्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. "आता केक बरोबर झाडही लावणार. मोठे झाल्यावर आपले झाड पाहायला मजा येईल" अशी प्रतिक्रिया विद्यार्थिनी आराध्या कैलास बोडके हिने दिली आहे.
ग्रामस्थांनी या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला असून, वनविभाग आणि ग्रामपंचायत यांच्याकडून रोपट्यांसाठी मदत मिळण्याची शक्यता आहे.
हवामान बदल आणि वृक्षतोड यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर लहान पातळीवरून उपाय करण्याचा खामुंडी जिल्हा परिषद शाळेचा हा प्रयत्न इतर ग्रामीण शाळांसाठी आदर्श ठरू शकतो.

No comments: