"खडूचा काळ संपेल, पण शिक्षक कधीच संपणार नाही!" – मुख्याध्यापक अनिल चौगुले यांचा शिक्षक दिनी प्रेरणादायी संदेश
"खडूचा काळ संपेल, पण शिक्षक कधीच संपणार नाही!" – मुख्याध्यापक अनिल चौगुले यांचा शिक्षक दिनी प्रेरणादायी संदेश.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"शिक्षक हा शिक्षकच राहतो. काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलते, पण शिक्षकाचे स्थान कधीच बदलत नाही," असे प्रेरणादायी उद्गार राजश्री शाहू माध्यमिक विद्यालय, महाळुंगे येथील मुख्याध्यापक अनिल चौगुले यांनी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले.
करवीर तालुक्यातील महाळुंगे येथील राजश्री शाहू माध्यमिक विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक अनिल चौगुले यांच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना चौगुले म्हणाले, "शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार आहे. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांसाठी नव्हे, तर उत्तम शिक्षक आणि चांगले नागरिक होण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. भविष्यात तंत्रज्ञानामुळे शिक्षकांच्या हातातील खडूची जागा पेन आणि डिजिटल साधने घेतील, मात्र शिक्षकाची भूमिका कायम तितकीच महत्त्वाची राहील."
कार्यक्रमात विद्यार्थिनी वैष्णवी कांबळे, प्रांजली मोरे, ऋणाली पाटील तसेच विद्यार्थी राजवीर पाटील आणि गंधर्व चौगुले यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगणारी मनोगते व्यक्त करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी शिक्षक सचिन गुरव, सुदेश जाधव, चंद्रकांत पाटील, यशपाल जाधव, सुनील भोसले, विलास भाट, संजय भोई, विजय शिंदे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमातून शिक्षकांविषयीचा आदर आणि शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले.

No comments: