अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप!
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप!
------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-----------------------
गडमुडशिंगीतील घोरपडे वसाहतीतील प्रकरण; DNA अहवाल ठरला महत्त्वाचा पुरावा, विशेष POCSO न्यायालयाचा निकाल
.
करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथील घोरपडे वसाहतीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी सागर दिनकर ससाणे याला विशेष पोक्सो न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि १ हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, अशी शिक्षा सुनावली.
सन २०२० च्या उन्हाळ्यापासून सप्टेंबर २०२२ या कालावधीत पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पीडिता ही आरोपीची नातेवाईक असल्याचेही न्यायालयीन कामकाजात समोर आले.
या प्रकरणाचा उलगडा माता-बाल संगोपन सर्वेक्षणादरम्यान झाला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविकांना पीडित मुलीच्या पोटाकडे पाहिल्यानंतर संशय आला. त्यानंतर तिच्या नातेवाईकांना माहिती देऊन तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.
तपासादरम्यान पीडितेने आरोपीकडून जबरदस्तीने अत्याचार झाल्याची माहिती दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. आरोपीविरुद्ध POCSO कायद्यांतर्गत दोषारोपपत्र गांधी नगर पोलीस ठाण्यामार्फत न्यायालयात दाखल करण्यात आले.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी एकूण १४ साक्षीदार तपासले. सुनावणीदरम्यान पीडित मुलगी फितूर झाली असली, तरी तिचा व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे नोंदविलेला जबाब तसेच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात नोंदविलेला जबाब न्यायालयाने ग्राह्य धरला.
या
प्रकरणात पीडित मुलगी, तिची आई, डॉक्टर, पंच, दोन आशा सेविका, तपासी अंमलदार आणि सुलोचना नार्वेकर यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. त्याचबरोबर तोंडी, कागदोपत्री आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे तसेच पीडिता, आरोपी आणि अर्भकाचे DNA अहवाल सरकार पक्षाच्या बाजूने महत्त्वाचे ठरले.
DNA तपासणीत अर्भकाचे जैविक माता-पिता पीडिता आणि आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. या पुराव्यांसह विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी केलेला युक्तिवाद आणि सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या विविध निवाड्यांचे दाखले न्यायालयाने ग्राह्य धरले.
त्याआधारे विशेष POCSO न्यायाधीश ए. आय. पेरमपल्लीसो यांनी आरोपी सागर दिनकर ससाणे याला विविध कलमांखाली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि १,००० रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिना साधी कैद भोगावी लागणार आहे.
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात DNA पुराव्यासह इलेक्ट्रॉनिक आणि न्यायालयीन जबाब महत्त्वाचे ठरल्याने या निकालाकडे विशेष लक्ष लागले आहे.

No comments: