Header Ads

धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी शाहूवाडीत तीव्र निदर्शने.

 धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी शाहूवाडीत तीव्र निदर्शने.

-----------------------------

मलकापूर प्रतिनिधी 

रोहित पास्टे

-----------------------------

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या (ST) प्रवर्गात समावेश करून आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवारी शाहूवाडी तहसील कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली. ढोल-कैताळाच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजीने तहसील कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला.


आंदोलकांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार शुभांगी जाधव यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असून, समाज आपल्या घटनात्मक हक्कांसाठी लोकशाही व संविधानिक मार्गाने संघर्ष करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


आरक्षणाचा प्रश्न हा केवळ सामाजिक न्यायापुरता मर्यादित नसून, समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसह भावी पिढ्यांच्या राजकीय भवितव्याशीही संबंधित आहे. त्यामुळे शासनाने आता कोणतीही संदिग्ध भूमिका न घेता सर्वोच्च न्यायालयात धनगर समाजाची बाजू पूर्ण कायदेशीर ताकदीने मांडावी आणि हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.


आंदोलनाचे नेतृत्वकर्ते पांडुरंग वगरे (आबा) म्हणाले, “धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात सकल धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. शासनाने समाजाच्या भावनांचा अंत न पाहता आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी.”


या आंदोलनाला स्वाभिमानी पॅंथर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधत आपले मनोगत व्यक्त केले.


यावेळी दिलीप बंडगर, सतीश काळे, शुभम साखरे, सुनील काळे, अनिल कांबळे, सचिन कांबळे, प्रदीप माने, रवी शिसाळ, रायसिंग शिसाळ उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.