रिपब्लिकन सेना करवीरच्या पाठपुराव्याला यश; उर्दू माध्यमासाठी १२ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन
रिपब्लिकन सेना करवीरच्या पाठपुराव्याला यश; उर्दू माध्यमासाठी १२ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन
शिक्षणाधिकारी अशोक घुगे यांच्याकडून आदेश; उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा.
कोल्हापूर | प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त शिक्षक पदांचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, १२ अतिरिक्त शिक्षकांचे रिक्त पदांवर समायोजन करण्यात आले आहे. रिपब्लिकन सेना करवीर तालुक्याने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत प्राथमिक शिक्षण विभागाने ही कारवाई केली आहे.
रिपब्लिकन सेना करवीर तालुका अध्यक्ष भिमराव आनंदा गोंधळी यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे निवेदन सादर करून उर्दू माध्यम शाळांतील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी केली होती. त्यानंतर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक घुगे यांनी जिल्हास्तरीय समायोजन प्रक्रिया पूर्ण करून आदेश जारी केले.
संचमान्यता सन २०२५-२६ नुसार जिल्हास्तरावर अतिरिक्त ठरलेल्या २ अध्यापक आणि १० विषय शिक्षक, अशा एकूण १२ शिक्षकांचे उर्दू माध्यमाच्या रिक्त पदांवर समायोजन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे अनेक शाळांतील शिक्षकांची कमतरता दूर होण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती मिळणार आहे.
या पाठपुराव्यात जिल्हा महासचिव सागर कुरडे, शहराध्यक्ष प्रवीण आजवेकर, युवा जिल्हाध्यक्ष अमोल कांबळे, करवीर महासचिव अर्जुन कांबळे, विनोद कांबळे, करवीर संघटक शिवाजी कांबळे, कोषाध्यक्ष संदीप गोंधळी आणि महिला आघाडी अध्यक्षा रसिका चौगुले यांचाही सहभाग होता.
याबाबत प्रतिक्रिया देताना तालुका अध्यक्ष भिमराव गोंधळी म्हणाले, "उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आमचा लढा पुढेही सुरू राहणार आहे. सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल शिक्षण विभागाचे आभार."

No comments: