सरकारी नोकरीच्या नावाखाली २१.१० लाखांचा गंडा! मेळघाटात बनावट नियुक्तीपत्र देणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात
सरकारी नोकरीच्या नावाखाली २१.१० लाखांचा गंडा! मेळघाटात बनावट नियुक्तीपत्र देणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात.
अमरावती | जिल्हा प्रतिनिधी : पी. एन. देशमुख.
------------------------------------------------------
अमरावती:- सरकारी टपाल विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील तीन तरुणांची तब्बल २१ लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धारणी मेळघाट पोलिसांनी बाबू बन्सी धुर्वे (वय ५१, रा. धारणी) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी नानकराम खासदेकर यांची मुलगी पोस्टमन पदावर नोकरीला लावण्याचे आश्वासन देत मे २०२३ मध्ये ५.५० लाख रुपये घेतले. एवढेच नव्हे तर तिला बनावट नियुक्तीपत्र देऊन अमरावती येथे रुजू होण्यासाठी पाठवले. मात्र तेथे गेल्यानंतर नियुक्तीपत्र बनावट असल्याचे समोर आले.
याच आरोपीने सुरेश खासदेकर यांच्या मुलाकडून ७.६० लाख रुपये, तर मोगदा येथील नामदेव सुडस्कर यांच्या मुलाकडून ८ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. तिन्ही प्रकरणांमध्ये बनावट नियुक्तीपत्र देऊन सरकारी नोकरीचे आमिष दाखवण्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे नोंद आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काही रक्कम परत करण्यात आली, मात्र उर्वरित पैसे देण्यास आरोपी टाळाटाळ करू लागला. “साहेब बाहेर गेले आहेत, आले की ड्युटीवर जावे लागेल,” असे सांगून आरोपी वेळकाढूपणा करत होता. नंतर त्याने फोन उचलणेही बंद केले, असा आरोप फिर्यादीने केला आहे.
धारणी मेळघाट पोलीस ठाण्यात नानकराम खासदेकर यांच्या तक्रारीवरून तसेच आर्थिक गुन्हे शाखेच्या परवानगीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फसवणुकीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.

No comments: