बहिरेश्वर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी यात्रेत डॉल्बीचा वापर; ८ डॉल्बी सिस्टीम जप्त, मंडळांवर गुन्हा दाखल.
बहिरेश्वर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी यात्रेत डॉल्बीचा वापर; ८ डॉल्बी सिस्टीम जप्त, मंडळांवर गुन्हा दाखल.
---------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
रहिम पिंजारी
---------------------------------------
कोल्हापूर:बहिरेश्वर (ता. करवीर) येथील प्राचीन श्रीकृष्ण मंदिर यात्रा उत्सवात नियमांचे उल्लंघन करून डॉल्बीचा वापर करणाऱ्या मंडळांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या कारवाईत ८ डॉल्बी सिस्टीम आणि वाहने जप्त करण्यात आली असून, संबंधित मंडळांचे अध्यक्ष, डॉल्बी मालक आणि ट्रॅक्टर मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. *नीलोत्पल सो*. यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलिसांनी ही धडक कारवाई केली.आगामी गणेशोत्सव शांततामय, उत्साहपूर्ण आणि डॉल्बीमुक्त वातावरणात साजरा व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाने आवाहन केले होते. मात्र, श्रीकृष्ण जन्माष्टमी यात्रेदरम्यान करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथे क्रॅक मेंबर्स, एस पी बॉईज, फेमस ग्रुप, रॉयल क्लब, फार्म हाऊस ग्रुप, एम पी बॉईज, युवा सर्कल ग्रुप, पठार किंग ग्रुप या तरुण मंडळांनी डॉल्बी लावण्याची परवानगी मागितली होती. प्रशासनाने त्यांना फक्त स्पिकरची परवानगी दिली होती आणि ध्वनीप्रदूषण नियम व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ प्रमाणे नोटिसा बजावल्या होत्या.या नोटिसांचे उल्लंघन करून मंडळांच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बी लावला, आवाजाची स्पर्धा केली, तसेच ट्रॅक्टरच्या बोनेटवर फळी टाकून डान्स केला. या बेकायदेशीर कृत्यामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ०८ मॉर्डिफाय केलेले ट्रॅक्टर, ०८ डॉल्बी सिस्टीम आणि ०६ टेम्पो/वाहने पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतली आहेत.पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा कडक इशारा दिला आहे की, आगामी गणेशोत्सवात डॉल्बीला फाटा देऊन पारंपारिक वाद्यांचा वापर करावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

No comments: