कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीसह सहा तालुके दुष्काळग्रस्त घोषित; शेतकऱ्यांना दिलासा देणारे मोठे निर्णय.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीसह सहा तालुके दुष्काळग्रस्त घोषित; शेतकऱ्यांना दिलासा देणारे मोठे निर्णय.
------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------------
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून राधानगरी, पन्हाळा, भुदरगड, आजरा, चंदगड आणि गगनबावडा हे सहा तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. याबाबत शासनाने परिपत्रक जारी केले असून संबंधित तालुक्यांतील तहसीलदारांना तातडीने अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत.
दीर्घकाळ पावसाचा खंड, पिकांचे मोठे नुकसान आणि निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून विविध सवलती व उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रमुख सवलती
जमीन महसुलात सूट.
पीक कर्जाचे पुनर्गठन.
शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती.
७.५ हॉर्स पॉवरपर्यंतच्या कृषी वीजपंपांच्या चालू वीजबिलात सूट.
मनरेगा अंतर्गत जास्तीत जास्त कामे सुरू करण्यासाठी निकषांमध्ये शिथिलता.
आवश्यक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था.
दुष्काळग्रस्त गावांमध्ये कृषी वीज जोडणी खंडित न करण्याचे निर्देश.
शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू नये यासाठी विशेष व्यवस्था.
जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याचे नियोजन.
शासनाने यापूर्वी जारी केलेल्या दुष्काळ निवारण मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक तालुक्यात पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे आदेश तहसील प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments: