अमरावतीत ‘छोटा डॉन’वर एमपीडीएचा दणका! खून, जबरी चोरीसह ८ गंभीर गुन्हे; थेट मध्यवर्ती कारागृहात रवानगी
अमरावतीत ‘छोटा डॉन’वर एमपीडीएचा दणका! खून, जबरी चोरीसह ८ गंभीर गुन्हे; थेट मध्यवर्ती कारागृहात रवानगी
फ्रेझरपुरा पोलिसांची धडक कारवाई; प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही गुन्हेगारी सुरूच, आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक इशारा.
अमरावती | जिल्हा प्रतिनिधी : पी. एन. देशमुख
अमरावती शहरातील फ्रेझरपुरा परिसरात गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या श्रावण उर्फ ‘छोटा डॉन’ राजेश बनारसे (वय १९, रा. महादेव खोरी, अमरावती) याच्यावर पोलिस प्रशासनाने एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. सोमवारी, २१ सप्टेंबर २०२६ रोजी त्याची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, श्रावण बनारसे याच्यावर सन २०२५ पासून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे प्रकरणे दाखल आहेत. फ्रेझरपुरा, राजापेठ, नांदगाव पेठ तसेच अमरावती ग्रामीण परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये खून, जबरी चोरी, घरफोडी, मारहाण, दुखापत करणे, अवैध शस्त्र बाळगणे आणि तडीपार आदेशाचे उल्लंघन अशा स्वरूपाचे एकूण ८ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही गुन्हेगारी सुरू
यापूर्वी संबंधित आरोपीवर प्रतिबंधात्मक तसेच तडीपारची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्याच्या कथित गुन्हेगारी हालचाली सुरूच असल्याने पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली.
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा ‘कडक’ इशारा
आगामी सण-उत्सवांच्या काळात अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला आणि पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाईची प्रक्रिया पूर्ण करून आयुक्तांकडून आवश्यक मंजुरी मिळवली. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी आरोपीला ताब्यात घेऊन अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
शहरातील सक्रिय गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर असून, आगामी काळातही कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा अमरावती शहर पोलिस प्रशासनाने दिला आहे.

No comments: