Header Ads

नियमांचे पालन करत नशामुक्त व आदर्श गणेशोत्सव साजरा करा.

नियमांचे पालन करत नशामुक्त व आदर्श गणेशोत्सव साजरा करा.


पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांचे गणेश मंडळांना आवाहन

मलकापूर प्रतिनिधी : येणारा गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करावा. पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, ध्वनी प्रदूषण टाळावे तसेच नशामुक्त गणेशोत्सव साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण करावा, असे आवाहन शाहूवाडी-पन्हाळा पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी केले.


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येळाणे येथील गणेश मल्टिपर्पज हॉलमध्ये तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील व प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना गिल्डा बोलत होते.


यावेळी बोलताना गिल्डा म्हणाले, “उत्सव जरूर साजरा करा; मात्र तो आदर्श असावा. ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. साऊंड सिस्टीमचा वापर शासनाने व प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसारच करावा. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.” तसेच गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवून नशामुक्त गणेशोत्सवाला प्राधान्य द्यावे. आदर्श पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचा गौरव करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


युवकांना संदेश देताना गिल्डा यांनी, उत्सव काळात कायद्याचे उल्लंघन होईल असे कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही, याची प्रत्येक युवकाने काळजी घ्यावी, असे आवाहन केले. एखाद्या चुकीच्या कृत्यामुळे कायदेशीर कारवाई झाल्यास त्याचा विपरीत परिणाम युवकांच्या करिअरवर होऊ शकतो. त्यामुळे नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.


पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी गणेश मंडळांसाठी असलेल्या विविध नियमांची माहिती देत उत्सव काळात घ्यावयाची खबरदारी, सुरक्षितता व कायदा-सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले. मंडळांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवर पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.


यावेळी नगराध्यक्षा रश्मी कोठावळे, पंचायत समिती सदस्य अभयसिंह चौगुले, नायब तहसीलदार प्रदीप जाधव, पोलीस उपनिरीक्षक अतुल सोनुले, आश्लेषा घाडगे, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रवीण कुंभारे, सुलतान शेळके, पंचायत समिती विस्ताराधिकारी कदम, बांधकाम विभागाचे विनायक कुंभार आदी उपस्थित होते. तसेच नगरसेवक रमेश नाईक, किरण घेवदे, महेंद्र कोठावळे, शाहूवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी, होमगार्ड, विविध गावांचे पोलीस पाटील आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.