Header Ads

घरफोडी अन् दुचाकी चोरीचा पर्दाफाश; सराईत चोरटा जेरबंद!

 घरफोडी अन् दुचाकी चोरीचा पर्दाफाश; सराईत चोरटा जेरबंद!

------------------------------------

 फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

सांगली मिरज प्रतिनिधी 

राजू कदम 

------------------------------------

एलसीबीची धडाकेबाज कारवाई; दोन गुन्हे उघड, ६० हजारांचा मुद्देमाल जप्त.


घरफोडी करून रोख रक्कम लंपास करणाऱ्या तसेच दुचाकी चोरी करणाऱ्या रोहित बाजीराव आकळे (वय ४०, रा. माणकेश्वर मंदिराजवळ, गोळेवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. या कारवाईत घरफोडी आणि मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून तब्बल ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथकांना सूचना दिल्या होत्या.


त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या पथकाला ३० सप्टेंबर रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रोहित आकळे हा आष्टा शहर परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असून त्याच्याकडील दुचाकी चोरीची आहे. तो पेठ नाक्याच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच पथकाने आष्टा-पेठ रस्त्यावर सापळा रचला.

काही वेळाने संशयित दुचाकीवरून येताना दिसताच पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली. दुचाकीच्या मालकीबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्या खिशातून ५ हजार रुपये रोख मिळाले.

पोलिसांच्या चौकशीत त्याने सदर रक्कम शिगाव येथील एका कार्यालयातून चोरी केलेल्या पैशांपैकी असल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच त्याच्याकडील दुचाकी सातारा जिल्ह्यातील उब्रज परिसरातून चोरी केल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले.

पोलीस अभिलेख तपासल्यानंतर आष्टा पोलीस ठाण्यातील घरफोडीचा गुन्हा आणि सातारा जिल्ह्यातील उब्रज पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरीसंदर्भातील गुन्हा उघडकीस आला.

दुचाकीसह रोकड जप्त

पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ५५ हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेण्डर मोटारसायकल आणि ५ हजार रुपये रोख, असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपीविरुद्ध यापूर्वीही घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी आष्टा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्यासह पोलीस हवालदार संदीप गुरव, अतुल माने, अरुण पाटील, मच्छींद्र बर्डे, उदयसिंह माळी, पोलीस कॉन्स्टेबल सुरज थोरात, संकेत कानडे, रोहन घस्ते, पवन सदामते, अमोल शिंदे, संतोष माने, विजय पाटणकर आदींनी सहभाग घेतला.

No comments:

Powered by Blogger.