Header Ads

हुपरी-कोल्हापूर मार्गावरील पुलाचे काम रखडले; अपघातांचा धोका वाढला!

 हुपरी-कोल्हापूर मार्गावरील पुलाचे काम रखडले; अपघातांचा धोका वाढला!

-------------------------

करवीर प्रतिनिधी 

 संजय कुंभार

-------------------------

पुलाचे काम तातडीने पूर्ण करा, अन्यथा रास्ता रोकोचा इशारा; शिवसेना ठाकरे गट आक्रमक

हुपरी-कोल्हापूर या अत्यंत वर्दळीच्या राज्य मार्गावरील उचगाव यादववाडी येथील ओढ्यावरील पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत रखडल्याने वाहनधारक आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पुलाचे उर्वरित काम तातडीने सुरू करून पूर्ण करावे, अन्यथा हुपरी-कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने देण्यात आला.


हुपरी-कोल्हापूर हा उचगाव, गडमुडशिंगी, कोडोलीसह कर्नाटकाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच एस.टी. बसेस, दुचाकी, चारचाकी आणि अवजड मालवाहतूक वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा महत्त्वाच्या मार्गावरील पुलाचे काम काही दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पुलाजवळ शाळा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

पुलाच्या परिसरात लहान मुलांची मोठी शाळा असून सुमारे २० ते २५ स्कूल बसेस दररोज या मार्गावरून ये-जा करतात. पुलाच्या कामामुळे निर्माण झालेल्या वळणावर विशेषतः रात्रीच्या वेळी गडमुडशिंगीकडून येणाऱ्या दुचाकीस्वारांना रस्त्याची स्थिती व वळणाचा अंदाज न आल्याने अपघातांचा धोका वाढला असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

“काम कधी पूर्ण होणार? स्पष्ट कालमर्यादा जाहीर करा”

पुलाचे काम नेमके कोणत्या कालावधीत पूर्ण होणार, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट कालमर्यादा जाहीर करावी. वाहनधारकांची गैरसोय आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन कामाला प्राधान्य देत ते तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. काम सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस संबंधित विभाग जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला.

याबाबत करवीर तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन दिले.


यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले, “हुपरी-कोल्हापूर हा मोठ्या रहदारीचा मार्ग आहे. दररोज हजारो वाहने तसेच अवजड वाहतूक या मार्गावरून जाते. त्यामुळे मुख्य मार्गावरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. कामाला गती न दिल्यास रास्ता रोको करण्यात येईल.”

उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट म्हणाले की, गडमुडशिंगीकडून येणारी वाहने वेगाने येत असल्याने पुलाच्या कामाच्या ठिकाणी असलेले वळण अचानक समोर येते. त्यामुळे अपघात घडत असल्याने पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे.

दरम्यान, शाखा अभियंता अमोल कोळी यांनी सध्या पुलाचे काम बंद असल्याचे सांगून, ते तातडीने सुरू करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात येतील आणि काम पूर्ण करण्यासाठी कार्यवाही केली जाईल, असे शिवसेना शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

यावेळी राजू यादव, पोपट दांगट, राजू सांगावकर, हर्षल पाटील, बाळासो नलवडे, योगेश लोहार, सचिन नागटिळक, दिलीप देसाई, अजित चव्हाण, प्रकाश मुदुगडे, कृष्णात तुरुके, सुनील पारपाणी, बाबुराव पाटील, रामराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.