अमरावतीत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भाजप पदाधिकाऱ्यांचा आक्रमक पवित्रा; बेपत्ता विद्यार्थिनीच्या शोधासाठी पोलिसांची धावपळ
अमरावतीत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भाजप पदाधिकाऱ्यांचा आक्रमक पवित्रा; बेपत्ता विद्यार्थिनीच्या शोधासाठी पोलिसांची धावपळ.
अमरावती | पी. एन. देशमुख, जिल्हा प्रतिनिधी
अमरावती शहरातील महिला व तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातून एका विद्यार्थिनीच्या बेपत्ता होण्याची माहिती मिळताच भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात आक्रमक पवित्रा घेत पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी केली.
यानंतर कोतवाली पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत डी.बी. पथकासह पोलिसांची तीन पथके शोधकार्यासाठी रवाना केली आहेत. विद्यार्थिनीच्या मित्रपरिवार, नातेवाईक तसेच कुटुंबीयांकडे चौकशी करून संभाव्य आरोपींचा शोध सुरू आहे.
अमरावतीतील यापूर्वीच्या महिला व विद्यार्थिनींवरील गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, संबंधित प्रकरणात लवकरच ठोस तपास निष्पन्न होऊन आरोपींवर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

No comments: