Header Ads

कुपवाडच्या मेन चौकातील सांगली जिल्हा पोलीस मदत कक्ष कायम बंद! नागरिकांच्या सुरक्षेचा बोजवारा

 कुपवाडच्या मेन चौकातील सांगली जिल्हा पोलीस मदत कक्ष कायम बंद! नागरिकांच्या सुरक्षेचा बोजवारा

कुपवाड प्रतिनिधी: कुपवाड एमआयडीसी मेन रोड लगत असलेल्या संत रोहिदास कमानी जवळ नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शहरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी उभारण्यात आलेला *सांगली जिल्हा पोलीस मदत कक्ष* गेल्या अनेक महिन्यांपासून कायम बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या मदत कक्षाचा मूळ उद्देशच फसला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कुपवाड शहर हे औद्योगिक वसाहत जवळ असल्याने येथे दिवसभर हजारो कामगार, नागरिक आणि व्यापाऱ्यांची मोठी वर्दळ असते. येथे किरकोळ भांडणे, चोरी आणि अवैध धंद्यांवर आळा बसावा यासाठी सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून उत्साहात हा मदत कक्ष उभारला होता. पण प्रत्यक्षात या मदत कक्षाच्या दाराला कायम कुलूप लटकलेले असते. दारावर धूळ, जळमटं साचली असून आतमध्ये एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसतो.

     *दारू दुकानांमुळे गुन्हेगारीत वाढ*

धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी हा पोलीस मदत कक्ष आहे, त्याच्या आजूबाजूला दारूची दुकाने आणि वाईन शॉप आहेत. त्यामुळे सायंकाळ नंतर येथे तळीरामांची मोठी गर्दी होते. दारू पिऊन रस्त्याच्या मधोमध उभे राहून दंगा करणे, शिवीगाळ, वादावादी आणि महिलांची छेडछाड असे प्रकार या परिसरात सर्रास वाढले आहेत.

        *"सांगली जिल्हा पोलीस मदत कक्ष आहे, पण मदत करायलाच कोणी नाही! जर या कक्षात किमान दोन कर्मचारी जरी कायम असतील, तर गुन्हेगारांवर वचक राहील आणि अशा घटना घडणार नाहीत,"* असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गातून उपस्थित केला जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी महिला आणि कामगार वर्गाला या परिसरातून जाताना असुरक्षित वाटत आहे.

       नागरिकांच्या सुरक्षेसाठी हाजारो रुपये खर्च करून उभारलेला हा *सांगली जिल्हा पोलीस मदत कक्ष* केवळ शोभेची वस्तू बनला आहे. हा कक्ष तात्काळ सुरु करून येथे २४ तास पोलीस कर्मचारी नियुक्त करावेत, अशी जोरदार मागणी कुपवाड मधील ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

No comments:

Powered by Blogger.