मित्राच्या वाढदिवसासाठी फिरायला गेले अन् काळाने घाला घातला!
मित्राच्या वाढदिवसासाठी फिरायला गेले अन् काळाने घाला घातला!
रत्नापूर तलावात दोन १७ वर्षीय मुलांचा बुडून मृत्यू; रात्री सव्वानऊ वाजता मृतदेह बाहेर.
अमरावती | पी. एन. देशमुख, जिल्हा प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील भानखेड परिसरातील जंगल भागात असलेल्या रत्नापूर तलावात बुडून दोन १७ वर्षीय मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मित्राच्या वाढदिवसानिमित्त आठ ते नऊ मित्रांचा समूह गुरुवारी दुपारी तलाव परिसरात फिरण्यासाठी गेला होता. मात्र, सायंकाळच्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेत दोन मुलांचा जीव गेला.
भानखेड मुख्य मार्गापासून सुमारे अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर रत्नापूर तलाव आहे. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भावेश संतोष चव्हाण (वय १७, रा. ज्योती कॉलनी, गोपाल नगर, अमरावती) आणि प्रवेश शैलेश कडू (वय १७, रा. किरण नगर, अमरावती) हे तलावाच्या पाण्यात बुडाले.
तलावातील पाण्याची खोली अधिक असल्याने दोघांनाही बाहेर येता आले नाही. घटनेची माहिती मिळताच मुलांचे नातेवाईक, पोलीस तसेच बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तलावात शोधमोहीम सुरू करण्यात आली.
दरम्यान, नातेवाईकांच्या मदतीने भावेशचा, तर बचाव पथकाच्या शोधमोहीमेत प्रवेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. गुरुवारी रात्री सुमारे सव्वानऊ वाजता दोन्ही मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आले.
घटनेची माहिती परिसरात पसरताच तलावाजवळ नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. बडनेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या घटनेची पुढील कार्यवाही सुरू आहे.
मित्राच्या वाढदिवसानिमित्त आनंदाचे क्षण घालवण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन कुटुंबांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

No comments: