मिरजेत कारमधून दोन पिस्तुले जप्त; दोघांना अटक.
मिरजेत कारमधून दोन पिस्तुले जप्त; दोघांना अटक
--------------------------------
कुपवाड मिरज प्रतिनिधी
राजु कदम
-------------------------------
एलसीबीची कारवाई; दोन जिवंत काडतुसे व वाहनासह ९ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त
मिरज : भारतनगर येथील ख्रिश्चन दफनभूमीजवळ काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीची पिस्तुले, दोन जिवंत काडतुसे आणि हुंडाई व्हेन्यू कार, असा एकूण ९ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दर्शन अनिल कांचळे (वय २६, रा. ईदगाहनगर झोपडपट्टी, मिरज) आणि शेखर महावीर लोंढे (वय २९, रा. माजी सैनिक वसाहत, सह्याद्रीनगर, मिरज) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्यासोबत पिस्तुलांच्या खरेदी-विक्रीप्रकरणी आकाश ढिगे (रा. कोपल, जि. गदग, कर्नाटक) याचे नाव समोर आले असून तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर भारतनगर परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित वाहनाची पंचांसमक्ष झडती घेतली असता दोघांकडे पिस्तुले व प्रत्येकी एक जिवंत काडतूस आढळले. पिस्तूल बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०१/२०२६, भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे व पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने केली.

No comments: