Header Ads

कोपेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारात ‘बुद्धमूर्ती’ सापडल्याची माहिती! खिद्रापूरमध्ये चर्चेला उधाण; पुरातत्त्व विभागाकडून तपासणी व संवर्धनाची मागणी

 कोपेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारात ‘बुद्धमूर्ती’ सापडल्याची माहिती!

खिद्रापूरमध्ये चर्चेला उधाण; पुरातत्त्व विभागाकडून तपासणी व संवर्धनाची मागणी.

खिद्रापूर, ता. शिरोळ : येथील ऐतिहासिक कोपेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना उत्खननादरम्यान तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती सापडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, मूर्तीच्या ऐतिहासिक व पुरातत्त्वीय महत्त्वाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मूर्ती सापडल्याची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदर मूर्तीची पाहणी करून तिचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता योग्य पद्धतीने संवर्धन व जतन करण्याची मागणी केली.

दरम्यान, या घटनेची माहिती पुरातत्त्व विभाग तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे. सापडलेल्या मूर्तीची पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांकडून शास्त्रोक्त पद्धतीने पाहणी करण्यात यावी. मूर्ती नेमक्या कोणत्या कालखंडातील आहे, तिचे पुरातत्त्वीय महत्त्व काय आहे आणि तिचा ऐतिहासिक संदर्भ काय आहे, याबाबत अधिकृत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात सोमवारी तहसीलदार तसेच पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. सापडलेल्या बुद्धमूर्तीचे योग्य पद्धतीने संवर्धन करून तिचे जतन खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर परिसरातच करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.

या मूर्तीच्या ऐतिहासिक वारशाचे जतन होण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, तसेच पुरातत्त्व तज्ज्ञांकडून अधिकृत तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

मूर्ती नेमकी कोणत्या कालखंडातील आहे? तिचा कोपेश्वर मंदिराच्या इतिहासाशी काय संबंध आहे? याबाबत पुरातत्त्व विभागाच्या तपासणीनंतरच अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे

No comments:

Powered by Blogger.