कोल्हापूर येथील हॉकी स्टेडियम चौकातील खड्डे आणि अपघातांच्या धोक्याविरोधात टाळ वाजवा आंदोलन; कायमस्वरूपी दुरुस्ती करणेची आंदोलकांची मागणी..!!
कोल्हापूर येथील हॉकी स्टेडियम चौकातील खड्डे आणि अपघातांच्या धोक्याविरोधात टाळ वाजवा आंदोलन; कायमस्वरूपी दुरुस्ती करणेची आंदोलकांची मागणी..!!
प्रतिनीधी- अभयकुमार नेर्लेकर
---------------------------
कोल्हापूर दि.११ : कोल्हापूर शहरातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या हॉकी स्टेडियम चौकात रस्त्याची दुरावस्था झालेली असून, मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दूचाकी,चारचाकी वाहनधारक तसेच भागातील नागरिक यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे संबंधीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिक, रहिवासी यांचे वतीने "टाळ वाजवा आंदोलन "आज करण्यात आले.
हॉकी स्टेडियमचा चौक हा कोल्हापूर शहरातील सर्वात जास्ती रहदारीचा आणि वर्दळीचा चौक तर बनला आहेच,त्याबरोबर
संभाजीनगर एसटी आगाराकडे जाणाऱ्या एसटी बसेस याच चौकातून जात असतात.आर.के. नगर, कळंबा, पाचगाव या उपनगरांना तसेच शिवाजी पेठ, मंगळवार पेठ अशा शहरातील मुख्य भागांशी जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने येथे एसटी, केएमटी तसेच अवजड वाहनांचीदेखील मोठी वर्दळ असते. मात्र, एवढी वाहतूक असूनही चौकात आवश्यक वाहतूक सुरक्षेच्या उपाय योजनांचा अभाव आहे.आवश्यक ठीकाणी स्पीड ब्रेकर नाहीत.
दरवर्षी पावसाळ्यात रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली जाते. मागील वर्षी नव्याने करण्यात आलेला रस्ताही एका पावसात खराब झालेला असल्याने कामाच्या दर्जाबाबतदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाऊस पडून गेला की,खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे छोटेमोठे अपघातांचा धोका वाढला आहे.
या समस्येबाबत यापूर्वीही स्थानिक नागरिकांनी आंदोलने केली असून, प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
हॉकी स्टेडियम चौकातील रस्त्याची तसेच स्टेडियमकडून रामानंदनगर कडे जाणाऱ्या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत, वाहतूक सिग्नल कायम स्वरूपी सुरु असावी,झेब्रा क्रॉसिंगची व्यवस्था करावी आणि आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
यावेळी "रस्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा..!!"प्रशासनाचं करायचं काय..खाली डोकं वर पाय..!!""झाला रे झाला खड्डा मोठ्ठा झाला..!!"गेली रे गेली गाडी गेली..अरेअरे माणसं मेली" अशा घोषणा,टाळ वाजवत देण्यात आल्या.
प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन नागरिकांना सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारादेखील नागरिकांच्या वतीने देण्यात आला.
या आंदोलनात चंद्रकांत कांडेकरी, राहूल चौधरी, अभयकुमार नेर्लेकर, रामेश्वरपतकी,ॲड.प्रमोद दाभाडे, संतोष मरगज,अजित निकम, नागेश आवळे यांच्यासह हॉकी स्टेडीयम परिसरातील नागरिक, व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या आंदोलनाच्या वेळेला हॉकी स्टेडियम परिसरातील जाणारे वाहन चालक आणि नागरिक यांच्यामध्ये आंदोलनाची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आणि या गंभीर समस्येवर आंदोलन केल्याबद्दल आंदोलनकर्त्यांनां अनेक नागरिकांनी पाठिंबादेखिल दिला आहे.
-प्रतिनीधी- अभयकुमार नेर्लेकर
---------------------------

No comments: