Header Ads

सडोली खालसा येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडाका! १३ जणांवर कारवाई; ३.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त

सडोली खालसा येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडाका! १३ जणांवर कारवाई; ३.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त

८ दुचाकी, १२ मोबाईल आणि रोख रक्कम पोलिसांच्या ताब्यात; जागामालकाचाही आरोपींमध्ये समावेश!

कोल्हापूर | प्रतिनिधी

करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर करवीर पोलिसांनी जोरदार छापा टाकत जुगार खेळणाऱ्यांसह जागामालकाला दणका दिला. या कारवाईत तब्बल १३ जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून, ८ मोटारसायकली, १२ मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ८२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सडोली खालसा गावच्या हद्दीतील कडकाचा माळ येथील गणपत पाटील यांच्या जनावरांच्या शेडमध्ये काही जण पैशांची बाजी लावून तीन पानी पत्त्यांचा 'पलास' नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर

यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.१० वाजता छापा टाकला.

यावेळी जयदीप गोविंद पाटील, धिरज महादेव मोहिते, सनी अशोक महापुरे पाटील, रविंद्र आकाराम कांबळे, तुषार तानाजी पाटील, कृष्णात शशिकांत मदने, उत्तम वसंत पाटील, विठ्ठल लक्ष्मण खाडे, सागर लक्ष्मण सातपुते, शिवाजी गोविंद पाटील, सर्वेश मधुकर जाधव आणि वैभव सदाशिव पाटील हे बारा जण जुगार खेळताना आढळून आले. तसेच जुगारासाठी जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी गणपत वसंत पाटील यांच्यावरही कारवाई करण्यात आली.

या सर्व १३ जणांविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ५ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

No comments:

Powered by Blogger.