दिवाळी भेटवस्तूंच्या वाटपात खऱ्या पत्रकारांवर अन्याय? बातम्या प्रसिद्ध करणारे यादीबाहेर, बातम्या न लावणारे मात्र भेटवस्तू घेण्यात आघाडीवर!
दिवाळी भेटवस्तूंच्या वाटपात खऱ्या पत्रकारांवर अन्याय? बातम्या प्रसिद्ध करणारे यादीबाहेर, बातम्या न लावणारे मात्र भेटवस्तू घेण्यात आघाडीवर!
वर्षभर बातम्यांच्या माध्यमातून प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकारांना साधी विचारपूसही नाही; यूट्यूब चॅनलच्या नावाखाली भेटवस्तू गोळा करणाऱ्यांची मात्र चलती! शासकीय कार्यालये आणि संस्थांच्या पत्रकार याद्यांवर उपस्थित होतोय गंभीर प्रश्न!
विशेष वृत्त |
दिवाळी आली की शासकीय कार्यालये, राजकीय नेत्यांची कार्यालये आणि विविध संस्थांकडून पत्रकारांना स्नेहभेट देण्याची परंपरा पाहायला मिळते. मात्र, यंदा या भेटवस्तूंच्या वाटपावरून पत्रकारिता क्षेत्रात एक वेगळाच प्रश्न उपस्थित होत आहे. वर्षभर संबंधित कार्यालयांच्या बातम्या प्रसिद्ध करणारे, प्रत्येक घडामोड जनतेपर्यंत पोहोचवणारे पत्रकार यादीबाहेर; तर प्रत्यक्षात बातम्या प्रसिद्ध न करणारे काही जण भेटवस्तू घेण्यात आघाडीवर असल्याचे चित्र समोर येत आहे.
बातम्या प्रसिद्ध करणारे दुर्लक्षित, भेटवस्तू घेणारे मात्र पुढे!
वर्षभर मेहनत घेऊन शासकीय योजना, विकासकामे, राजकीय घडामोडी, सामाजिक उपक्रम आणि विविध संस्थांच्या बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारांची नावे दिवाळी भेटवस्तूंच्या यादीतून गायब कशी होतात? संबंधित कार्यालयांना नियमित बातम्या पाठवणाऱ्या पत्रकारांना साधी माहितीही दिली जात नाही, मग या याद्या तयार करताना नेमका कोणता निकष लावला जातो?
दुसरीकडे, केवळ एखादे यूट्यूब चॅनल असल्याचे सांगून दोन-चार जणांना सोबत घेऊन फिरणारे काहीजण भेटवस्तू मिळवण्यात मात्र आघाडीवर असल्याची चर्चा आहे. प्रत्यक्ष पत्रकारितेत किती योगदान आहे, वर्षभर किती बातम्या प्रसिद्ध केल्या, याची कोणतीही शहानिशा न करता भेटवस्तूंचे वाटप होत असेल, तर हा प्रकार निश्चितच विचार करायला लावणारा आहे.
पत्रकारितेच्या नावाखाली भेटवस्तूंचा बाजार?
खरा पत्रकार आपले काम बातम्यांच्या माध्यमातून सिद्ध करतो. त्यासाठी त्याला कोणत्याही भेटवस्तूची किंवा विशेष सन्मानाची अपेक्षा नसते. मात्र, पत्रकारितेच्या ओळखीचा वापर केवळ दिवाळी भेटवस्तू मिळवण्यासाठी होत असेल, तर त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो.
मोठ्या वृत्तवाहिन्या आणि दैनिकांच्या अधिकृत प्रतिनिधींचा विषय वेगळा असला, तरी विशेषतः काही ठिकाणी यूट्यूब चॅनलच्या नावाखाली पत्रकार म्हणून वावरणाऱ्यांच्या पात्रतेबाबत आणि प्रत्यक्ष कामाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
याद्या तयार करणाऱ्या जबाबदार व्यक्तींनी उत्तर द्यावे!
दिवाळी भेटवस्तूंच्या याद्या तयार करताना संबंधित कार्यालयांनी काही साधे प्रश्न विचारण्याची गरज आहे.
संबंधित व्यक्ती खरोखर पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहे का?
वर्षभर संबंधित कार्यालयाच्या किती बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत?
त्या व्यक्तीचे वृत्तांकन आणि जनहिताच्या बातम्यांमधील योगदान काय आहे?
संबंधित माध्यमाचे अस्तित्व आणि नियमित कामकाज याची खात्री केली आहे का?
वर्षभर संपर्कात असणाऱ्या आणि नियमित बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारांची नावे यादीतून का वगळली जातात?
दिवाळी भेट ही सदिच्छेचे प्रतीक आहे; ती कोणाची भीक नाही किंवा कोणावर केलेले उपकारही नाहीत. मात्र, भेटवस्तूंच्या वाटपात दुजाभाव होत असेल, तर त्यावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
दिवाळी भेट ही सदिच्छेचे प्रतीक आहे; ती कोणाची भीक नाही किंवा कोणावर केलेले उपकारही नाहीत. मात्र, भेटवस्तूंच्या वाटपात दुजाभाव होत असेल, तर त्यावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
शेवटी एकच सवाल...
वर्षभर बातम्या प्रसिद्ध करून संबंधितांना प्रसिद्धी मिळवून देणारे पत्रकार दुर्लक्षित राहणार आणि पत्रकारितेच्या नावाखाली भेटवस्तू गोळा करणाऱ्यांचा सन्मान होणार, असेच चित्र कायम राहणार का?
पत्रकारितेची खरी ओळख दिवाळी भेटवस्तूंच्या पिशव्यांमध्ये नसते, तर वर्षभर केलेल्या निर्भीड, प्रामाणिक आणि जनहिताच्या कामात असते!
भेटवस्तूंच्या यादीपेक्षा पत्रकारांच्या कामाची दखल घ्या; कारण पत्रकारितेचा स्वाभिमान भेटवस्तूंवर नाही, तर कर्तृत्वावर उभा असतो!

No comments: