Header Ads

कुपवाड मधील पाण्याच्या टाकीजवळ वाहतुकीचा बोजवारा!

 कुपवाड मधील पाण्याच्या टाकीजवळ वाहतुकीचा बोजवारा!

रस्त्याची दुरवस्था, चौकात नागरिकांची गर्दी आणि रस्त्याकडेला उभ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी; प्रशासनाचे दुर्लक्ष कधी थांबणार?


सांगली | प्रतिनिधी :

कुपवाड मध्ये असलेल्या मध्यवर्ती पाण्याच्या टाकीजवळील चौकात सध्या वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, चौकात नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी तसेच रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त उभी केली जाणारी दुचाकी व इतर वाहने यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या चौकातून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, दुचाकीस्वार आणि इतर वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्याच्या कडेला नागरिकांची गर्दी होत असल्याने वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्याची दुरवस्था आणि बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती, अतिक्रमणावर नियंत्रण आणि वाहतूक नियोजन करण्याची गरज आहे.

नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

छायाचित्र : मध्यवर्ती पाण्याच्या टाकीजवळील चौकातील वाहतूक कोंडीचे विदारक चित्र.


No comments:

Powered by Blogger.