राधानगरीत शेतीच्या वादातून रक्तरंजित हाणामारी! वडिलांना काठ्यांनी बेदम मारहाण; वाचवायला गेलेल्या मुलालाही लक्ष्य
राधानगरीत शेतीच्या वादातून रक्तरंजित हाणामारी! वडिलांना काठ्यांनी बेदम मारहाण; वाचवायला गेलेल्या मुलालाही लक्ष्य
चांदेकरवाडीत एकाच कुटुंबातील तिघांविरोधात गुन्हा दाखल; दोघे जखमी, काठ्यांचा वापर.
राधानगरी | प्रतिनिधी
शेतीच्या कारणावरून सुरू असलेल्या जुन्या वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित हाणामारीत झाल्याची घटना राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथे घडली. वडिलांना काठ्यांनी मारहाण सुरू असल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या मुलालाही आरोपींनी काठ्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत पिता-पुत्र दोघेही जखमी झाले असून, याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरोधात राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन यशवंत खोत (वय ४३, रा. चांदेकरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे भाऊबंद असलेल्या शिवाजी महादेव खोत, रितेश शिवाजी खोत आणि वैशाली शिवाजी खोत यांच्याशी शेतीच्या कारणावरून पूर्वीपासून वाद सुरू आहेत.
दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ६.२५ वाजण्याच्या सुमारास आंबिका गल्लीतील आरोपींच्या घरासमोर हा प्रकार घडला. फिर्यादी यांनी वडील यशवंत गोपाळ खोत यांना दुकानातून कोलगेट आणण्यासाठी फोन केला असता, फोनवर भांडणाचा आवाज ऐकू आला. त्यामुळे सचिन खोत तातडीने गावात गेले. त्यावेळी त्यांचे वडील जमिनीवर पडलेले असताना आरोपी तिघेही त्यांना काठ्यांनी मारहाण करत असल्याचे दिसून आले. वडिलांच्या डोक्यातून रक्तस्राव होत होता.
वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या सचिन खोत यांच्यावरही आरोपींनी काठ्यांनी हल्ला केला. त्यांच्या दोन्ही हातांवर, डोक्यावर आणि पाठीवर मारहाण करण्यात आली. दरम्यान, शेजारी राहणारे सुदाम खोत यांनी मध्यस्थी करून आरोपींना रोखले. त्यानंतर जखमी वडिलांना बाजूला नेण्यात आले.
पुढे वडिलांना रुग्णालयात नेण्यासाठी चारचाकी आणण्याकरिता जात असताना आरोपींपैकी शिवाजी आणि रितेश खोत यांनी सचिन यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४००/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ११८(१), ३५१(३), ३५२ व ३(५) प्रमाणे तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परी पोलीस उपनिरीक्षक खोत पुढील तपास करीत आहेत.
शेतीच्या वादातून थेट काठ्यांनी हल्ला करण्यापर्यंत मजल गेल्याने चांदेकरवाडी परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.

No comments: