गरिबांच्या ताटातील तांदळावर काळाबाजार्यांचा डल्ला! १९४.९६ क्विंटल शासकीय तांदूळ ट्रकसह जप्त; २७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
गरिबांच्या ताटातील तांदळावर काळाबाजार्यांचा डल्ला! १९४.९६ क्विंटल शासकीय तांदूळ ट्रकसह जप्त; २७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
महागावमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; तिघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल.
पुसद | तालुका प्रतिनिधी
गरिबांच्या हक्काचा घासच काळ्या बाजारात विक्रीसाठी निघाल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गरजू लाभार्थ्यांना मिळणारा तब्बल १९४.९६ क्विंटल शासकीय तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी ट्रकमधून वाहून नेला जात असल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने उघड केला. या कारवाईत तांदळासह ट्रक असा अंदाजे २७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पुसद कॅम्प पथक उमरखेड उपविभागातील महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर-तुळजापूर मार्गावर गस्त घालत होते. यावेळी ट्रक क्रमांक MH-26-BE-1821 मधून तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
पोलिसांनी तातडीने ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये तांदळाची पोती आढळली. चालक अंबादास नंदू व्यवहारे याच्याकडे तांदळाच्या खरेदीची पावती, बिल्टी व वाहतुकीचा वैध परवाना मागितला असता त्याला कोणतीही कागदपत्रे सादर करता आली नाहीत.
तहसीलच्या अहवालाने काळाबाजाराचा संशय स्पष्ट!
सदर तांदूळ शासकीय सार्वजनिक वितरण प्रणालीतील आहे किंवा नाही, याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तहसील कार्यालय महागावशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर २ नोव्हेंबर २०२६ रोजी पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात ट्रकमधील १९४.९६ क्विंटल तांदूळ हा सार्वजनिक वितरण प्रणालीतील शासकीय तांदूळ असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर चालक अंबादास नंदू व्यवहारे, शेख शौकत शेख महताब आणि वाजिद (पूर्ण नाव माहीत नाही, रा. देगलूर) या तिघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील कलम ३ व ७ अन्वये महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे आणि महागाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड, पुरवठा अधिकारी मोहन कोल्हे तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

No comments: