Header Ads

शेतकऱ्याचा ट्रॅक्टर अन् ब्लोअर चोरून कर्नाटकात विक्रीचा डाव! मिरज ग्रामीण पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या

 शेतकऱ्याचा ट्रॅक्टर अन् ब्लोअर चोरून कर्नाटकात विक्रीचा डाव! मिरज ग्रामीण पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या

तिकोट्यातून ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त; सांगलीतील चोरीचा गुन्हा उघड, आणखी दोन साथीदारांचा शोध सुरू

मिरज | प्रतिनिधी

शेतकऱ्याच्या शेतातील ट्रॅक्टर आणि औषध फवारणीचा ब्लोअर चोरून ते स्वतःचे असल्याचे भासवत विक्री केल्याचा प्रकार मिरज ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी कर्नाटकातील तिकोटा येथील मेहबुब गौसमोदी सारवान (वय ३५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून तब्बल ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शेती साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ५७२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार या प्रकरणाचा तपास सुरू होता.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिग्विजय काकासाहेब इंगवले (वय २५, रा. विश्रामबाग, सांगली) यांच्या संतोषवाडी येथील शेतातून २३ ऑक्टोबरच्या सकाळी ८ ते २४ ऑक्टोबरच्या सकाळी ७.३० या कालावधीत इस्कॉर्ट कुबोटा कंपनीचा फार्मट्रॅक २६ एचपी ट्रॅक्टर आणि सुपर अॅग्रो कंपनीचा निळ्या रंगाचा औषध फवारणीचा ब्लोअर अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता.

या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी विशेष पथक तयार केले. पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक थेट कर्नाटकातील तिकोटा येथे पोहोचले.

तेथे मेहबुब गौसमोदी सारवान याच्याकडे संशयास्पद ट्रॅक्टर आणि ब्लोअर असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने १० ते १२ दिवसांपूर्वी संबंधित ट्रॅक्टर आणि ब्लोअर आपलेच असल्याचे सांगून खरेदीदाराला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी ट्रॅक्टरचे चेसीस व इंजिन क्रमांक तपासले असता, ते मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.

४ लाखांचा ट्रॅक्टर आणि ५० हजारांचा ब्लोअर जप्त

पोलिसांनी ४ लाख रुपये किमतीचा फार्मट्रॅक २६ एचपी ट्रॅक्टर आणि ५० हजार रुपये किमतीचा निळ्या रंगाचा औषध फवारणीचा ब्लोअर असा एकूण ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल पंचनाम्याने जप्त केला आहे.

या प्रकरणात आणखी दोन साथीदारांचा सहभाग असल्याची माहिती प्रेस नोटमध्ये नमूद असून, त्यांचा शोध सुरू आहे. या गुन्ह्यामागे आणखी काही चोरीच्या घटनांचे धागेदोरे आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत संकपाळ, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, सचिन पवार

तसेच सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे आणि विजय पाटणकर यांच्या पथकाने केली.

पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.