Header Ads

कास पठारावर पोलीस चौकी उभारणीच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न!

 कास पठारावर पोलीस चौकी उभारणीच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न!


सातारा जिल्हा प्रतिनिधी - अमर इंदलकर

पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी छत्रपती संघटनेचा पुढाकार; पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती

कास (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर पर्यटक, स्थानिक नागरिक आणि निसर्गप्रेमी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रस्तावित पोलीस चौकी उभारणीच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. छत्रपती संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकारातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.


या भूमिपूजन कार्यक्रमास मेढा पोलीस ठाण्याचे API सुधीर पाटील, संदीप शिंदे तसेच वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी कास पठार येथील कर्मचारी सोमनाथ बुडळे, सुजित जांभळे, आनंद किर्दत, विष्णू किर्दत यांच्यासह छत्रपती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कास पठार हे जैवविविधता आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध असलेले पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. विशेषतः पर्यटन हंगामात पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने वाहतूक नियंत्रण, पर्यटकांना मदत, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध करून देणे आवश्यक ठरते.

या पार्श्वभूमीवर कास पठारावर पोलीस चौकी उभारण्याचा पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या चौकीमुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेला बळ मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पर्यटनस्थळाचा नावलौकिक जपत पर्यटकांची सुरक्षितता आणि स्थानिक नागरिकांचे हित जपण्यासाठी छत्रपती संघटनेने घेतलेला हा पुढाकार निश्चितच स्वागतार्ह ठरत आहे.

No comments:

Powered by Blogger.