साखरी व किरवे येथे कोल्ह्याच्या हल्ल्यात सात जण जखमी... वन प्रशासनाच्या बाबत ग्रामस्थ नाराज...
साखरी व किरवे येथे कोल्ह्याच्या हल्ल्यात सात जण जखमी...
वन प्रशासनाच्या बाबत ग्रामस्थ नाराज...
माधुरी मस्कर-पन्हाळा
गवा रेड्याच्या हल्ल्यानंतर आता थेट मोठी दहशत साळवण परिसरात पसरली आहे. साखरी येथे कोल्ह्याच्या हल्ल्यात ५ जण जखमी झाले आहेत. तर किरवे येथेही कोल्ह्याने दोघांना चावा घेतल्याची घटना घडली आहे....
गगनबावडा तालुक्यातील साखरी येथे अचानक मानवी वस्तीत घुसलेल्या कोल्ह्याने हल्ला केला असून या हल्ल्यात अजित मेंगाने, लक्ष्मण चौगले, चंद्रकांत कोटकर, चंद्राबाई कोटकर आणि शोभा कोटकर हे पाच जण जखमी झाले आहेत. तर किरवे येथील भाऊ लक्ष्मण पाटील आणि आक्काताई शंकर पाटील या दोघांना कोल्ह्याने चावा घेऊन जखमी केले आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सर्व नागरिकांना तातडीने उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. वन विभागाकडून कोल्ह्याचा शोध घेतला जात असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सलग दोन ठिकाणी कोल्ह्याचे हल्ले झाल्याने शेतकरी, महिला आणि लहान मुलांमध्ये भीती वाढली आहे. वाढत्या वन्यप्राण्यांच्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने या परिसरात तातडीने गस्त वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.वन विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे प्राणी गावागावात घुसू लागले आहेत. अनेक वेळा आंदोलने करूनही वनविभाग सुस्त काम करत आहे. त्यामुळे वन विभागाच्या कारभाराबाबत स्थानिक नागरिकांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे...

No comments: