सातबारा दुरुस्तीसाठी १५ हजारांची लाच मागितली; १२ हजार स्वीकारताना खासगी इसम ACBच्या जाळ्यात!
सातबारा दुरुस्तीसाठी १५ हजारांची लाच मागितली; १२ हजार स्वीकारताना खासगी इसम ACBच्या जाळ्यात!
नागावमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई; खाजगी उमेदवारासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
कोल्हापूर | प्रतिनिधी
सातबारा उताऱ्यावरील क्षेत्राची दुरुस्ती करून जमिनीवर नाव नोंदविण्याच्या कामासाठी चक्क १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे उघडकीस आला आहे. तडजोडीनंतर १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे नागाव परिसरातील महसूल विभागाच्या कामकाजाबाबत चर्चेला उधाण आले आहे.
नेमका प्रकार काय?
तक्रारदाराची नागाव येथे वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीच्या गटामध्ये चुकीचे क्षेत्र नोंदविले गेल्याने त्याची दुरुस्ती करून सातबारा उताऱ्यावर योग्य क्षेत्र नोंदविण्यासाठी त्यांनी तहसीलदार कार्यालय, हातकणंगले येथे अर्ज केला होता. हे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी नागाव येथील तलाठी कार्यालयाकडे आले होते. तसेच सातबारा उताऱ्यावर स्वतःचे नाव नोंदविण्यासाठीही तक्रारदाराने आवश्यक कागदपत्रे सादर केली होती.
या कामाबाबत विचारणा केली असता तलाठ्यांनी तक्रारदाराला कार्यालयातील खासगी उमेदवार अवधूत रामचंद्र लोंढे यांना भेटण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर लोंढे यांनी तलाठी मॅडम तुमचे क्षेत्र दुरुस्त करून सातबाऱ्यावर नाव नोंदवून देणार आहेत. त्यासाठी मॅडम यांनी १५ हजार रुपये मागितले असून ते त्यांच्याकडे द्यावे, अशी मागणी केल्याचा आरोप आहे.
ACBच्या पडताळणीत लाचेची मागणी निष्पन्न!
या प्रकारामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली. ACBने केलेल्या पडताळणीत अवधूत लोंढे यांनी काम करून देण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
तसेच खासगी इसम सुरज कुंतीनाथ सोळांकुरे यानेही तलाठी कार्यालयाकडून काम पूर्ण करून देण्याचे सांगत तडजोडीअंती १२ हजार रुपयांची लाच मागितल्याचे पडताळणीत समोर आले.
१२ हजार स्वीकारताच रंगेहाथ पकडले!
त्यानंतर पंचांसमक्ष सापळा कारवाई करण्यात आली. यावेळी सुरज कुंतीनाथ सोळांकुरे (वय ४२, रा. शिवाजी चौक, नागाव) याने तक्रारदाराकडून १२ हजार रुपये स्वीकारताच ACB पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
या प्रकरणात अवधूत रामचंद्र लोंढे (वय ३७, खासगी उमेदवार, ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, नागाव) आणि सुरज कुंतीनाथ सोळांकुरे या दोघांविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७अ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
ACBच्या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास माने, सचिन पाटील, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल संगीता गावडे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार, वैभव खोत आणि प्रशांत दावणे यांचा समावेश होता.
सातबारा दुरुस्तीसाठीही लाचेचा अडसर?
शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी दुरुस्त करणे आणि सातबारा उताऱ्यावरील नोंदी अद्ययावत करणे ही महसूल प्रशासनाची नियमित जबाबदारी आहे. मात्र, अशा कामांसाठी पैशांची मागणी होत असल्याचे प्रकार समोर येणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासातून आणखी काही बाबी उघड होतात का, याकडे आता परिसराचे लक्ष लागले आहे.

No comments: