बावेलीच्या साईराज मस्करची राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड
बावेलीच्या साईराज मस्करची राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
९५९५३१६२६६
कळे:- मूळचा बावेली (ता. गगनबावडा) येथील सुपुत्र कुमार साईराज संदीप मस्कर याने राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत दैदिप्यमान यश संपादन करत राष्ट्रीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे. अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने १९ वर्षांखालील ५१ किलो वजन गटात सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
या सुवर्ण यशाच्या जोरावर त्याची रांची (झारखंड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीमुळे गगनबावडा तालुक्यासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
साईराजच्या या यशामागे त्याची प्रशिक्षिका छाया खोंदल यांचे शिस्तबद्ध व मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर त्याचे आई-वडील यांचे सततचे प्रोत्साहन, तसेच सचिव श्री. पद्माकर कांबळे सर यांचे सहकार्य आणि संस्थेचे अध्यक्ष श्री. बाजीराव पाटील साहेब यांचे सततचे पाठबळ व प्रेरणा यामुळेच हे यश शक्य झाले.
लहान वयातच तायक्वांदो खेळाची आवड जोपासणाऱ्या साईराजने कठोर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हे यश खेचून आणले आहे. त्याच्या खेळातील सातत्य आणि आक्रमक शैलीमुळे त्याने राज्यभरातील तज्ज्ञांची वाहवा मिळवली आहे.
साईराजच्या राष्ट्रीय पातळीवरील निवडीबद्दल गगनबावडा, कळे, बावेली परिसरासह क्रीडा क्षेत्रातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रीय स्पर्धेतही तो अशीच चमकदार कामगिरी करून कोल्हापूरचे व महाराष्ट्राचे नाव उज्वल करेल, असा विश्वास क्रीडाप्रेमी व ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे.

No comments: