सांगलीत अपहरण करून जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद; १६.४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत!
सांगलीत अपहरण करून जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद; १६.४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत!
दोन आरोपी अटकेत, दोघे फरार; ७९.४० ग्रॅम सोन्याची चेन आणि गुन्ह्यातील वाहने जप्त!
सांगली | राजू कदम
सांगलीतील अपहरण करून जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, अन्य दोन आरोपी फरार आहेत.
२ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रशांत मधुकर रावळ हे मोटारसायकलवरून घरी जात असताना त्यांच्याबाबत अपहरण व जबरी चोरीचा प्रकार घडला. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१७/२०२६ दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी गजानन सिद्धू माने (३९) आणि मुझफ्फर सुलताना मुजावर (३५) या दोघांना जेरबंद केले आहे. तर ओंकार पाटील आणि शंभुराज साळुंखे हे दोघे फरार आहेत.
आरोपींकडून ११ लाख ४० हजार रुपये किमतीची ७९.४० ग्रॅम सोन्याची चेन, १ लाखाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल आणि ४ लाखांची फोर्ड फिगो कार असा एकूण १६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
फरार आरोपींचा शोध सुरू असून, या टोळीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याकडे लक्ष लागले आहे.

No comments: