Header Ads

नाव बदलून पुण्यात लपले, पण राजारामपुरी पोलिसांच्या नजरेतून सुटले नाहीत! मकोकातील दोन फरार आरोपी जेरबंद

 नाव बदलून पुण्यात लपले, पण राजारामपुरी पोलिसांच्या नजरेतून सुटले नाहीत! मकोकातील दोन फरार आरोपी जेरबंद

वेशांतर करून पोलिसांची पाळत; जांभूळवाडी तलाव परिसरातून दोघांना उचलले – ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी.


प्रतिनिधी : रहिम पिंजारी

कोल्हापूर : गुन्हा करून पोलिसांना गुंगारा देता येईल, या भ्रमात नाव बदलून पुण्यात लपून बसलेल्या दोन फरार आरोपींचा अखेर राजारामपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला. वेशांतर, गोपनीय माहिती आणि अचूक सापळा अशा नियोजनबद्ध पद्धतीने पोलिसांनी पुण्यातील जांभूळवाडी तलाव परिसरातून दोघांना ताब्यात घेतले. मकोका अंतर्गत कारवाई झालेल्या गंभीर गुन्ह्यातील या आरोपींच्या अटकेमुळे पोलीस तपासाला महत्त्वाचे यश मिळाले आहे.

वर्षभरापूर्वीच्या हल्ल्याने हादरले होते राजारामपुरी!

वर्षभरापूर्वीच्या हल्ल्याने हादरले होते राजारामपुरी!

१५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री राजारामपुरी परिसरातील लोखंडे वखारजवळ अंतर्गत वाद, आर्थिक फायदा आणि पूर्ववैमनस्यातून फिर्यादी व त्यांच्या मित्रावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मकोका अंतर्गत कलमे वाढविण्यात आली होती. तेव्हापासून त्र्यंबक वसंत गवळी (वय ३९) आणि अमित हनुमंत गवळी (वय १९, दोघे रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) हे फरार होते.

वेशांतर करून दिवसभर पाळत; अखेर सापळ्यात अडकले!

फरार आरोपींचा शोध सुरू असतानाच पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली. दोघेही पुणे जिल्ह्यातील आंबेगावजवळ जांभूळवाडी तलाव परिसरात नाव बदलून राहत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता पुणे गाठले.

परिसर दाट लोकवस्तीचा आणि झोपडपट्टीचा असल्याने आरोपींना संशय येऊ नये, यासाठी पोलिसांनी वेशांतर केले. दिवसभर परिसरावर बारकाईने नजर ठेवत आरोपींच्या हालचाली टिपल्या. योग्य संधी मिळताच सापळा रचून दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले.

७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी!

दोन्ही आरोपींना कोल्हापुरात आणून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शाहूवाडी उपविभागाचे पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा करीत आहेत.

या पथकाची धडाकेबाज कामगिरी

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे, पोलीस अंमलदार विशाल शिरगावकर, मिलिंद बांगर, शाहू तळेकर आणि गजानन हराळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कोल्हापुरातील गंभीर गुन्ह्यातील आरोपी पुण्यात नाव बदलून राहत असतानाही पोलिसांनी त्यांचा माग काढला. वेशांतर आणि अचूक नियोजनाच्या जोरावर केलेल्या या कारवाईमुळे राजारामपुरी पोलिसांच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

No comments:

Powered by Blogger.