Header Ads

१२ वर्षांचा घाम, ५० हून अधिक पुरस्कार अन् आता राष्ट्रीय रिंगणात धडक! रेंदाळचा प्रणव पेटकर सज्ज!

 १२ वर्षांचा घाम, ५० हून अधिक पुरस्कार अन् आता राष्ट्रीय रिंगणात धडक! रेंदाळचा प्रणव पेटकर सज्ज!

सुवर्णपदकांची मालिका कायम राखत प्रणवची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड; नोएडात दाखवणार पंचांचा दम!


सचिन कुंभार | रेंदाळ प्रतिनिधी

रेंदाळ : बॉक्सिंगच्या रिंगणात प्रतिस्पर्ध्याला भिडण्यासाठी केवळ ताकद पुरेशी नसते, तर त्यासाठी जिद्द, शिस्त, संयम आणि वर्षानुवर्षांची मेहनत लागते. याच मेहनतीच्या जोरावर रेंदाळच्या प्रणव माधव पेटकर याने आता राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. नोएडा येथे होणाऱ्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी बॉक्सिंग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली असून, रेंदाळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

बालवयापासून रिंगणाशी नाते!

गेल्या तब्बल १२ वर्षांपासून प्रणव बॉक्सिंगचा नियमित सराव करत आहे. अनेकदा अपयश आले, आव्हाने उभी राहिली; मात्र त्याने सरावातील सातत्य आणि मेहनतीची साथ कधीच सोडली नाही. त्याच जिद्दीचे फलित म्हणजे २०२५ आणि २०२६ मध्ये कोल्हापूर झोन तसेच इंटरझोन बॉक्सिंग स्पर्धांमध्ये पटकावलेली सुवर्णपदके. विविध स्पर्धांमधून त्याने आतापर्यंत ५० हून अधिक पुरस्कारांची कमाई केली आहे.

गुरूंचे मार्गदर्शन अन् यशाची भरारी!

प्रशिक्षक प्रवीण पाटील, सुजय खोपडे आणि मेजर विनायक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणवने बॉक्सिंगमधील कौशल्य अधिक धारदार केले. कठोर सराव, शिस्तबद्ध दिनक्रम आणि जिंकण्याची जिद्द या त्रिसूत्रीच्या जोरावर त्याने राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे.

आता प्रणवसमोर नोएडातील राष्ट्रीय स्पर्धेचे आव्हान आहे. स्थानिक मैदानावर घडलेला हा खेळाडू राष्ट्रीय रिंगणात आपल्या ठोशांचा दम दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या या निवडीमुळे रेंदाळसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रिंगणातील प्रत्येक ठोसा आता रेंदाळच्या स्वप्नांना बळ देणारा ठरणार आहे. प्रणवने राष्ट्रीय स्तरावरही सुवर्णयश संपादन करावे, हीच क्रीडाप्रेमींची अपेक्षा!

No comments:

Powered by Blogger.