जनावरांच्या गळ्यात घुंगरू बांधायचे तरी पैशांचा ठणठणाट! मेळघाटच्या ऐतिहासिक घुंगरू बाजारावर दुष्काळाचे सावट!
जनावरांच्या गळ्यात घुंगरू बांधायचे तरी पैशांचा ठणठणाट! मेळघाटच्या ऐतिहासिक घुंगरू बाजारावर दुष्काळाचे सावट!
अमरावती | मेळघाट | पी. एन. देशमुख, जिल्हा प्रतिनिधी
मेळघाट म्हटले की डोळ्यांसमोर येतो तो निसर्गरम्य परिसर आणि पशुपालनाची पारंपरिक संस्कृती! दिवाळीनंतर भरणारा ऐतिहासिक घुंगरू बाजार म्हणजे थाट्या समाजासाठी आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळा. मात्र, यंदा या परंपरेवर दुष्काळाचे सावट पसरले असून, बाजार भरला असला तरी थाट्या समाजाच्या चेहऱ्यावरील उत्साह मात्र हरवल्याचे चित्र दिसत आहे.
या बाजारात पशुपालन करणारा थाट्या समाज मोठ्या संख्येने सहभागी होतो. आपल्या जनावरांच्या सजावटीसाठी घुंगरू, दोरखंड, माळा आणि अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी गुराखी वर्षभर या बाजाराची प्रतीक्षा करतात.
विशेष म्हणजे, रात्रंदिवस रानावनात भटकंती करून जनावरांचे पालनपोषण करणाऱ्या गुराखी आणि पशुपालक समाजाला शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत असल्याची खंत व्यक्त होत आहे.
"शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी शासनाने मदत दिली, त्याचे स्वागतच आहे; मात्र रात्रंदिवस जनावरांच्या मागे फिरणाऱ्या आम्हा गुराख्यांचा सरकारला विसर पडला आहे. हातात पैसा नसल्याने यंदा घुंगरू बाजारात खरेदी करण्याचा उत्साहच उरलेला नाही," अशी व्यथा स्थानिक गुराखी साहेबराव सुमारे यांनी प्रतिनिधीशी बोलताना मांडली.
मेळघाटातील घुंगरू बाजार ही केवळ खरेदी-विक्रीची बाजारपेठ नसून, थाट्या समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचा आणि पशुपालनाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. मात्र, आर्थिक संकटामुळे या परंपरेतील उत्साहालाच ग्रहण लागले आहे.
शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला, मग गुराखी आणि पशुपालक समाजाला कधी आधार मिळणार? शासनाने मेळघाटातील या उपेक्षित पशुपालकांच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष देऊन विशेष मदत द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
घुंगरांचा निनाद तर ऐकू येतोय; पण गुराख्यांच्या मनातील आनंदाचा आवाज मात्र यंदा हरवलाय!

No comments: