Header Ads

ओतूरमध्ये राज्यव्यापी सत्यशोधक अधिवेशनाचे आयोजन; महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त भव्य सोहळा.

ओतूरमध्ये राज्यव्यापी सत्यशोधक अधिवेशनाचे आयोजन; महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त भव्य सोहळा.

ओतूर, ता. जुन्नर : सत्यशोधक भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील प्रतिष्ठान, ओतूर(ता.जुन्नर )यांच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यव्यापी सत्यशोधक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २१ नोव्हेंबर व रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सत्यशोधक नगरी, मार्केट यार्ड, ओतूर येथे हे दोन दिवसीय अधिवेशन होणार आहे.


क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना ओतूरमध्ये मुलींसाठी शाळा सुरू केली होती. त्या ऐतिहासिक कार्यामुळे ओतूरच्या स्त्रीशिक्षणाच्या प्रवासाला दिशा मिळाली. आजचा सुशिक्षित, प्रगत आणि जागरूक ओतूर घडण्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या विचारांचा मोठा वाटा आहे. त्याच ऐतिहासिक वारशाचा सन्मान करण्यासाठी आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.


महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे विचार समाजात रुजावेत, शिक्षणाचे महत्त्व प्रत्येकाला समजावे आणि शिक्षणातूनच समाजाची सर्वांगीण प्रगती होते, हा विचार नव्या पिढीच्या मनात रुजावा, हा या अधिवेशनामागचा मुख्य हेतू आहे.


या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत, व्याख्याते, लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. प्रा. शरद बाविस्कर, प्रा. सुभाष वारे, डॉ. अजित नवले, विवेकानंद पाटील, माजी खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अविनाश पाटील, पत्रकार संजय आवटे यांच्यासह अनेक मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.


हे अधिवेशन म्हणजे अनेक पुस्तकांचा सारांश, अनुभवांचा खजिना आणि विचारांची शिदोरी एकाच व्यासपीठावर मिळण्याची संधी असल्याचे आयोजकांनी सांगितले. ओतूर आणि पंचक्रोशीतील सर्व माता-भगिनी, युवक-युवती, विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, पालक, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व सुजाण नागरिकांनी या अधिवेशनाला आवर्जून उपस्थित राहावे, असे मनापासून आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


विशेषतः पालकांनी आपल्या मुलांना आणि तरुणांनी आपल्या मित्र-मैत्रिणींना सोबत घेऊन यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Powered by Blogger.