Header Ads

पट्टणकोडोलीत शेतकऱ्यांची आर्त हाक – अवेळी पावसाने पेरणी हुकली; कर्जबाजारी शेतकरी हतबल, पंचनाम्याची मागणी तीव्र!

 पट्टणकोडोलीत शेतकऱ्यांची आर्त हाक – अवेळी पावसाने पेरणी हुकली; कर्जबाजारी शेतकरी हतबल, पंचनाम्याची मागणी तीव्र!

*************************

*देवदास कांबळे मुक्त पत्रकार*

**************************

पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) :

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात अवेळी आणि मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. खरीप हंगामाची पेरणी करायची वेळ असतानाच आकाशाने रोष धरला आणि शेतकऱ्यांचे सर्व गणित बिघडले. जमिनी पाणथळ झाल्या, पेरणीयोग्य घात राहिला नाही, उभी पिके वाहून गेली. शेतकऱ्यांचे स्वप्न एका क्षणात चुरगळले गेले.

येत्या हंगामावर आधारलेला शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह आणि संसाराचा गाडा थेट रुळावरून घसरला आहे. खत, बियाणे, मजुरी यावर झालेले हजारो रुपयांचे खर्च आता वाऱ्यावर गेले असून शेतकरी अक्षरशः उघड्यावर आले आहेत.

शेतकऱ्याची व्यथा

शेतकरी आधीच कर्जबाजारी. बँका, सहकारी संस्था, खासगी सावकार यांच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेला शेतकरी पेरणीची वाट पाहत होता. पेरणीच्या घडीत आलेल्या या अवेळी पावसाने त्याची पाठ मोडली आहे.

गावातील एका शेतकऱ्याने डोळ्यांत पाणी आणून सांगितले –

माझ्या शेतात उभं पिकं पाण्यात वाहून गेलं. खत-बियाण्याचा खर्च फुकट गेला. कर्जाचा हप्ता डोक्यावर आहे, घर चालवायचं कसं? सरकारने तातडीने मदत केली नाही तर जगणं कठीण होईल.”

शेतकऱ्यांची मागणी

या संकटाच्या पार्श्वभूमीवर पट्टणकोडोलीतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन नापेर क्षेत्रांचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी ठाम मागणी केली आहे. तसेच तालुक्याचे आमदार यांनी शासन दरबारी आवाज उठवून या गंभीर प्रश्नावर ठोस उपाययोजना करावी, अशी अपेक्षाही व्यक्त झाली आहे.

शेतकऱ्यांचा इशारा

शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की –

*नापेर क्षेत्र जाहीर करून तातडीने मदत द्या.*

पीकविमा कंपन्यांनी तत्काळ भरपाई जाहीर करावी.

शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला त्वरित स्थगिती द्यावी.

वीजबिल व हप्त्यांवर सवलत जाहीर करावी.

*जर शासनाने या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.*

सध्याची परिस्थिती

एकीकडे पूरामुळे उभ्या पिकांचे नुकसान, तर दुसरीकडे पेरणीयोग्य घात न आल्याने खरीप हंगाम हुकण्याची भीती. अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी मानसिक खचला आहे. कर्जबाजारीपण, घरखर्च, मुलांचे शिक्षण, आजारपण या सर्व जबाबदाऱ्या त्याच्यावर आहेत. शेतकऱ्याच्या जगण्याचा प्रश्न आता शासनाने गांभीर्याने घेतला नाही तर ग्रामीण भागातून हंबरडा ऐकू येण्यास वेळ लागणार नाही.

शेतकरी हा देशाचा कणा मानला जातो; पण आज या कण्यावरच संकटाचा डोंगर कोसळला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी शासनाने ठामपणे उभे राहणे हीच खरी काळाची गरज आहे.

✍🏻 *देवदास कांबळे मुक्त पत्रकार*

No comments:

Powered by Blogger.