झुंबाचा उत्साह आणि ध्यानाची शांतता! कोल्हापुरात 'प्रफुल्लित केंद्रा'तर्फे आंतरराष्ट्रीय ध्यान दिन साजरा.
झुंबाचा उत्साह आणि ध्यानाची शांतता! कोल्हापुरात 'प्रफुल्लित केंद्रा'तर्फे आंतरराष्ट्रीय ध्यान दिन साजरा.
कोल्हापूर : "शरीर सुदृढ तर मन प्रसन्न" हा मंत्र जपत,क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील 'प्रफुल्लित केंद्र'च्या वतीने आंतरराष्ट्रीय ध्यान दिनानिमित्त ऐतिहासिक रंकाळा गार्डन,अंबाई टँक परिसरात एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्कआउट, झुंबा आणि ध्यान अशा त्रिसूत्रीमुळे हा सोहळा कोल्हापूरकरांसाठी अविस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साही वातावरणात झाली. उपस्थित नागरिकांसाठी विशेष 'वर्कआउट' आणि 'झुंबा' सत्राचे आयोजन करण्यात आले होते. संगीताच्या तालावर व्यायाम करताना उपस्थितांमध्ये कमालीची ऊर्जा पाहायला मिळाली.शरीरातील जडत्व दूर करून मनाला ध्यानासाठी तयार करणे, हा यामागचा मुख्य उद्देश होता.
झुंबाच्या उत्साहानंतर रंकाळ्याच्या निसर्गरम्य परिसरात सामूहिक ध्यान (Meditation) घेण्यात आले. यावेळी प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, "आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर थकतं, पण त्याहून अधिक मन थकतं. या थकलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्याचं आणि आंतरिक शांती मिळवून देण्याचं सामर्थ्य फक्त ध्यानात आहे."
या उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. "जीवनात पहिल्यांदाच अशा पद्धतीने ध्यान केल्याचा आनंद मिळाला. या ध्यानाने प्रचंड मानसिक समाधान लाभले," अशा भावना अनेक सहभागी महिला व पुरुषांनी व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, केवळ एक दिवस नव्हे तर यापुढे दररोज न चुकता ध्यान करण्याचा संकल्प यावेळी अनेकांनी केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अल्फिया बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने विशेष परिश्रम घेतले. यामध्ये श्रावणी पडळकर, श्वेता गुरव, समीक्षा प्रभावळे, करुणा दळवी, प्रणिता कोलपटे, नितुफा मुल्ला आणि अर्पिता मोरे या सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून शिस्तबद्ध नियोजन केले.
निसर्गरम्य रंकाळा, हवेतील गारवा, झुंबाचा उत्साह आणि त्यानंतर अनुभवायला मिळालेली ध्यानाची शांतता यामुळे हा कार्यक्रम कोल्हापूरच्या सार्वजनिक उपक्रमांमध्ये एक वेगळा ठसा उमटवून गेला. 'धन्यवाद मंत्रा' ने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments: