नागाव येथे जमिनीच्या वादातून धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला; ९ जखमी, ४० जणांवर गुन्हा.
नागाव येथे जमिनीच्या वादातून धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला; ९ जखमी, ४० जणांवर गुन्हा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील वड्याचा मळा परिसरात जमिनीच्या वादातून तलवारी, कोयते, काठ्या व लोखंडी रॉडसारख्या घातक शस्त्रांनी प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तिघेजण गंभीर तर पाच जण किरकोळ जखमी झाले असून एकूण ९ जण जखमी आहेत. याप्रकरणी सुमारे ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमींमध्ये दिपाली सुधाकर ऐतवडे, सुधाकर आनंदराव ऐतवडे, हर्ष प्रभाकर ऐतवडे, अभिषेक महेश सूर्यवंशी, अंकुश दत्तू गुडाळे, पार्थ जाधव, सिंधुताई आनंदराव ऐतवडे, साधना प्रभाकर ऐतवडे व सुनील यशवंत ऐतवडे (सर्व रा. नागाव) यांचा समावेश आहे. सर्वांवर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दुपारी सुमारे तीनच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर ऐतवडे व राजेंद्र चौगुले, महादेव चौगुले यांच्यात शेतजमिनीतील वहिवाटीच्या रस्त्यावरून अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. महसूल नोंदीप्रमाणे संबंधित रस्ता ऐतवडे यांच्या मालकीचा असल्याचे सातबारा उताऱ्यात नमूद आहे. याबाबत कागदपत्रे सादर केल्यानंतर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दोन्ही बाजूंना नोटीस देण्यात आली होती तसेच वाद असल्यास दिवाणी न्यायालयात जाण्याचा सल्लाही देण्यात आला होता.
दरम्यान, गुरुवारी प्रभाकर ऐतवडे हे आपल्या हद्दीनुसार कंपाउंड घालत असताना चौगुले यांनी कसबा सांगाव, गोकुळ शिरगाव आदी ठिकाणांहून नातेवाईकांना बोलावून घेतल्याचा आरोप आहे. चार ते पाच कारमधून आलेल्या ३० ते ३५ जणांनी घटनास्थळी येऊन जोरदार वाद घालत तलवारी, जंबिया, कोयते, फायटर, हॉकी स्टिक व काठ्यांनी ऐतवडे कुटुंबीयांवर हल्ला केला.
या मारहाणीत काही जण गंभीर जखमी झाले असून महिलांनाही मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच फिर्यादींच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतल्याची तक्रार आहे. शेतातील गहू पिकाचेही नुकसान करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्याचे पाहताच काही हल्लेखोरांनी उसाच्या शेतातून पळ काढला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसामग्री आढळून आली.
या प्रकरणी महादेव बाबुराव चौगुले, राजेंद्र बाबुराव चौगुले, सुधीर धोंडीराम चौगुले, सुभाष बापू चौगुले, संजय ज्ञानू चौगुले, सुकुमार धोंडीराम चौगुले (सर्व रा. नागाव), तसेच गणेश सागर माळी (रा. कसबा सांगाव), योगेश संजय माळी (रा. गोकुळ शिरगाव) व अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
घटनेमुळे नागाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

No comments: