Header Ads

*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर कडून अंतर-महाविद्यालय फुटबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन*

 *अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर कडून अंतर-महाविद्यालय फुटबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन*

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वतीने परिषदेच्या स्थापनेपासून 77 वर्षांमध्ये प्रथमच अंतर-महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे भव्य व यशस्वी आयोजन करण्यात आले. दिनांक 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत श्री छत्रपती संभाजी महाराज शासकीय क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.


या स्पर्धेच्या आयोजनासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अभाविपचे कार्यकर्ते कोल्हापूर शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये भेटी देत विद्यार्थ्यांना विद्यार्थी परिषदेच्या कार्याची माहिती देत होते. कोल्हापुरातील विद्यार्थ्यांच्या मध्ये फुटबॉल विषयी असणारी आवड लक्षात घेऊन तसेच फुटबॉल हा कोल्हापूर शहरासाठी जिव्हाळ्याचा खेळ असल्याने, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक बांधिलकी, क्रीडावृत्ती आणि संघभावना निर्माण व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.


 या स्पर्धेमध्ये कोल्हापूर महानगरातील एकूण 16 महाविद्यालयांच्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली क्रीडाक्षमता आणि संघभावना सादर केली. संपूर्ण स्पर्धेदरम्यान विविध सामन्यांमध्ये खेळाडूंनी उच्च दर्जाचा खेळ सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.


अंतिम निकालानुसार शिवराज महाविद्यालय यांनी प्रथम क्रमांक पटकावला, DYP फार्मसी कॉलेज द्वितीय, विवेकानंद महाविद्यालय तृतीय, तर न्यू मॉडेल कॉलेज यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला. विजेत्यांना अनुक्रमे ₹21,000/-, ₹16,000/-, ₹11,000/-, ₹6,000/- व सन्मान चिन्ह असे बक्षिसे प्रदान करण्यात आले. ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये क्रीडावृत्ती, शिस्त, संघभावना, नेतृत्व गुण आणि सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असे मत नगरसेविका सौ. रूपाराणी निकम व्यक्त केले. यापुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दरवर्षी युवक सप्ताह निमित्त फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे अभाविप प्रदेश मंत्री ॲड. अथर्व कुलकर्णी यांनी जाहीर केले.


बक्षीस वितरण समारंभासाठी प्रसिद्ध उद्योजक श्री. मिलिंद धोंड, कोल्हापूर महानगरपालिका नूतन महापौर सौ.रूपाराणी निकम, अभाविप प्रदेश मंत्री ॲड.अथर्व कुलकर्णी, कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक श्री.विजय खाडे पाटील, शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य श्री. सिद्धार्थ शिंदे, श्री. स्वागत परुळेकर, सिनेट सदस्य श्री. रतन कांबळे, शिवाजी विद्यापीठ क्रीडा विभाग प्रमुख डॉ. शरद बनसोडे, महानगर अध्यक्ष डॉ. सुनील गुरव, स्पर्धाप्रमुख अद्वैत पुणगावकर, तसेच सह-प्रमुख साहिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.