आदर्श शाळा मेढा येथे संस्कारमय पिढी घडविण्याचा संकल्प संपन्न.
आदर्श शाळा मेढा येथे संस्कारमय पिढी घडविण्याचा संकल्प संपन्न.
------------------------------------
सातारा जावली प्रतिनिधी.
शेखर जाधव
------------------------------------
जावळीची राजधानीतील,जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा, मेढा येथे १४ फेब्रुवारी या दिवशी पाश्चात्त्य पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृ-पितृ पूजन दिन अत्यंत भक्तीभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आदर्श शाळा मेढा आणि श्री योग वेदांत सेवा समिती, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने हा संस्कारमूल्य उपक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात गणपती व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे तसेच गुरुजनांचे पूजन करून कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी पालकांना समोर बसवून त्यांच्या चरणी वंदन केले, औक्षण करून फुलांनी पूजन केले व आशीर्वाद घेतले. सात फेऱ्यांच्या माध्यमातून आई-वडिलांप्रती आदर, सेवा आणि कर्तव्यनिष्ठा यांचा संकल्प विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
“आई-वडिलांचे पूजन केल्याने आयुष्य, विद्या, यश आणि बळ वाढते,” या शास्त्रवचनावर आधारित संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. दररोज पालकांना नमस्कार करून आशीर्वाद घेण्याचा निर्धार मुलांनी यावेळी केला.
पूजनावेळी अनेक पालक व विद्यार्थी भावूक झाले. मनोगत व्यक्त करताना काही पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. “समाजात वृद्धाश्रमांची संख्या वाढू नये यासाठी अशा संस्कारक्षम कार्यक्रमांची आवश्यकता आहे,” असे मत अनेक माता-पित्यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “जगात अनेक नाती लाभतात; परंतु आई-वडिलांसारखे निस्वार्थ प्रेम कोणी देऊ शकत नाही. त्यांच्या कष्टांची परतफेड शक्य नसली तरी त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करणे हेच खरे कर्तव्य आहे,” असा संदेश देण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांनी साश्रुनयनांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या प्रसंगी संस्कारमय व कर्तव्यदक्ष पिढी घडविण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला. आई-वडिलांचा सन्मान, सेवा आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमासाठी समितीचे सेवाधारी सुभाष गोरे, दीपक पाटील, योगेश जाधव, संतोष पाटील, जयश्री पाटील, शोभा पाटील, रूपाली गहिने तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका व बहुसंख्य पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत उपशिक्षक सुधाकर दुंदळे यांनी केले. समारोप स्मिता ननावरे यांनी तर आभार श्रीमती शिल्पा फरांदे यांनी केले.
चौकट :-
मातृ-पितृ पूजन दिनाचा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनावर संस्कारांची ठसठशीत छाप उमटवत आहे . शाळेतील विध्यार्थी यांचे पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून असे उपक्रम शाळेने वारंवार करावे जेणे करून विध्यार्थी संस्कारक्षम होईल.असे संस्कारप्रधान कार्यक्रम समाजात व्यापक प्रमाणावर राबविनेते यावेत
( उपनगराध्यक्ष विकास देशपांडे )

No comments: